इचलकरंजीत कचराप्रश्नी उद्रेक

By Admin | Published: September 18, 2016 01:09 AM2016-09-18T01:09:00+5:302016-09-18T01:11:08+5:30

पाच तास तणाव : मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मृत डुकरे टाकली; आंदोलकांना घेतले ताब्यात; आंदोलक, प्रशासनाचा मोर्चा-प्रतिमोर्चा

Ichalkaranjat garbage outbreak eruption | इचलकरंजीत कचराप्रश्नी उद्रेक

इचलकरंजीत कचराप्रश्नी उद्रेक

googlenewsNext

इचलकरंजी : तीन ते चार महिन्यांपासून शहरातील कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नागरिकांचा शनिवारी उद्रेक झाला. नगरसेविका मंगल मुसळे व त्यांचे पती बंडोपंत मुसळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी एका ट्रॉलीतून आणलेली मृत डुकरे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालन, टेबल व आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कार्यालयाच्या दारात टाकलीे. आणलेला कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारात ओतला. या प्रकाराने नगरपालिकेत सर्वत्र दुर्गंधी पसरली.
अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे नगरपालिकेत खळबळ माजली. हा प्रकार नगरपालिकेतील सर्व विभागांत समजताच कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन केले. मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधराजणांना ताब्यात घेतले . तर बंडोपंत मुसळे यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या वादग्रस्त कामाची चौकशी करण्याचा तक्रारी अर्ज दिला. दरम्यान मुसळेंसह आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजताच दत्तनगर व गणेशनगर परिसरातील नागरिकांनी नगरसेविका मंगल मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासन यांचा निषेध नोंदविला. असा हा गोंधळ सुमारे पाच तास सुरू होता.
गणेशनगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ते व गटारी यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलला नसल्याने त्या-त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून मृत झालेली डुकरे नगरसेविका मंगल मुसळे व त्यांचे पती बंडोपंत यांनी पालिकेला कळवूनसुद्धा ती उचलण्यात आली नव्हती. अशा प्रकारांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मुसळे यांच्यासह पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी येताना एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कचरा व मृत झालेली तीन डुकरे नगरपालिकेत आणली. ट्रॉलीतील कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारातच टाकला.
त्यानंतर एक डुकर आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कार्यालयाच्या दारात टाकले. आणि या आंदोलनकर्त्यांनी राहिलेली दोन डुकरे घेऊन आपला मोर्चा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाकडे वळविला. त्यातील एक डुकर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकले, तर एक डुकर मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले. अचानक घडत असलेला हा प्रकार पाहून मुख्याधिकारी डॉ. रसाळ खुर्चीवरून उठले. आणि त्यांनी मुसळे यांना संबोधत आंदोलनाची पद्धत चुकीचे असल्याचे सुनावले. तेव्हा मुसळे व मुख्याधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शिवराळ आरोपांचा वापर करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यातच उर्वरित आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार करीत मुख्याधिकाऱ्यांना भंडावून सोडले. परिणामी, दालनातील वातावरण तंग बनले.
नगरपालिका कार्यालयात सुटलेली दुर्गंधी आाणि घडलेला प्रकार समजताच पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र आले. घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत काम बंद आंदोलन सुरू केले. कामगारांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह एकत्र येऊन नगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद केले. अशा प्रकारचे आंदोलन, उडालेला गोंधळ हा प्रकार सुमारे दोन तास सुरू होता.
प्रवेशद्वारात एकत्र आलेल्या कामगार संघटनांनी झालेल्या प्रकाराचा निषेध करीत पालिका कार्यालय बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे कार्यालयात टाकलेली डुकरे आंदोलनकर्त्यांनीच उचलावीत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे वातावरणातील तणावात आणखीनच भर पडली. मृत डुकरांमुळे सुटलेल्या दुर्गंधीमुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचारी तोंडाला रुमाल बांधून वावरत होते.
दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह आलेल्या पोलिसांनी मुसळे यांच्यासह अन्य मोर्चेकरी आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर चालत जाऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदविला. त्याठिकाणी असलेल्या पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्याकडे आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधराजणांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच दत्तनगर व गणेशनगर परिसरातील महिला व पुरुष नागरिकांनी नगरसेविका मंगल मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासन यांचा निषेध नोंदविला. (प्रतिनिधी)


समझोत्याचा प्रयत्न
हा गोंधळ घडत असतानाच माजी आमदार अशोकराव जांभळे, सागर चाळके, बांधकाम समितीचे सभापती लतीफ गैबान, नगरसेवक भाऊसाहेब आवळे, प्रकाश मोरबाळे, आदींनी पालिका प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी तक्रार देण्याची भूमिका कायम ठेवली.

Web Title: Ichalkaranjat garbage outbreak eruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.