शुभेच्छा फलकावरून इचलकरंजीत तणाव
By Admin | Published: June 23, 2015 12:58 AM2015-06-23T00:58:22+5:302015-06-23T00:58:22+5:30
दोन्ही गटांकडून घोषणाबाजी : जवाहरनगर परिसरात काही काळ जमावबंदी
इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरातील मराठा चौकात लावलेल्या शुभेच्छा फलकावरून सोमवारी सायंकाळी दोन गटांत पुन्हा वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी जवाहरनगर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला. रात्री ती शिथिल करण्यात आली. याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रभर शहरात पोलीस गाड्या गस्त घालत होत्या.
जवाहरनगर परिसरातील मराठा चौकालगत प्रार्थनास्थळ आहे. एका समाजाचा पवित्र महिना सुरू झाल्याने काही नागरिकांनी या महिन्याच्या शुभेच्छांचा फलक या चौकात उभारला. गुरुवारी रात्री तो अज्ञातांनी फाडला. यामुळे शुक्रवारी सकाळी एका समाजाच्या नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार बंदोबस्त नेमला होता.
सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाऱ्यामुळे हा फलक थोडा वाकल्याने पुन्हा गैरसमज निर्माण झाला. त्यातच विनापरवाना हा फलक लावल्याने तो काढून घ्यावा, अशी तक्रार नगरपालिकेकडे आली. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हा फलक काढण्यासाठी आले. तेथे नागरिक व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्यात परवाना घेऊन फलक लावण्याबाबत चर्चा सुरू झाली. यावेळी परिसरातील दोन्ही समाजाचे तरुण जमले. त्यांनी परस्परविरोधी घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव वाढला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंनी चर्चा व वादविवाद होऊन वाद निवळला. शिवसेनेचे मलकारी लवटे यांनी पोलिसांशी बोलणी झाली असून, विनापरवाना फलक लावला जाणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळात नव्याने शुभेच्छा फलक तयार करून पोलीस बंदोबस्तात उभारण्यात आला. त्यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली.
फलक उभारण्याचे काम पुन्हा सुरू झाल्याचे समजताच गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकत्र जमू लागले. त्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून जमावाला पांगविले. यावेळी १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू केली. पोलिसांनी स्ट्रायकिंग फोर्ससह मोठा पोलीस बंदोबस्त ठावला आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक महंमद मकानदार, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, शिवाजी कणसे, सतीश पवार, डी. एल. सुरवसे यांच्यासह अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. (वार्ताहर)
...तर वाद वाढला नसता !
पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही बाजूच्या नागरिकांना समजावून सलोख्याने तोडगा काढला असता, तर वाद एवढा विकोपाला गेला नसता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
एक तासासाठी जमावबंदी
दरम्यान, इचलकरंजीत केवळ एक तासासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आता तेथील परिस्थिती शांत आहे, असे रात्री उशिरा जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापुरात पत्रकारांना सांगितले.