इचलकरंजीत वाहतुकीस शिस्त

By admin | Published: June 16, 2017 11:52 PM2017-06-16T23:52:14+5:302017-06-16T23:52:14+5:30

वाहतूक आराखड्यास मंजुरी : सूचना, हरकती नागरिकांनी दाखल करण्याचे आवाहन

Ichalkaranjat Transportation Discipline | इचलकरंजीत वाहतुकीस शिस्त

इचलकरंजीत वाहतुकीस शिस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्था आराखड्याला प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी मंजुरी मिळाली आहे. याची अंमलबजावणी २७ जून ते २७ जुलै या कालावधीत केली जाणार आहे. या कालावधीत येणाऱ्या अडचणींनुसार नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून त्यानुसार आराखड्यात बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी दिली.
प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मंजूर झालेला आराखडा वाचून दाखविण्यात आला. आराखड्यातील नमूद व्यवस्थेनुसार बदल करण्यासाठी आवश्यक सूचना फलक, पार्किंग व झेब्रा क्रॉसिंग पट्टे यांसह आवश्यक तयारी शहर वाहतूक शाखा व नगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. तयारीसाठी अंमलबजावणीची तारीख २७ जून ठरविली. विशेष म्हणजे सन २०१४ साली नगरपालिकेने या वाहतूक आराखड्याला मंजुरी दिली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी सन २०१७ मध्ये परवानगी मिळाली. त्यामुळे यामध्ये अनेक बदल आवश्यक असल्याचे बैठकीत उपस्थितांनी मांडले.
प्रांताधिकारी शिंगटे व डॉ. बारी यांनी हरकती व सूचनांमध्ये आवश्यक बदल व तक्रारी घेऊन त्यानुसार अंतिम आराखडा केला जाईल, असे स्पष्ट केले. एक महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी आपल्या सूचना, हरकती व तक्रारी शहर वाहतूक शाखा व नगरपालिका यांच्याकडे कराव्यात, असे आवाहनही केले. बैठकीस पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलीस निरीक्षक सतीश पवार, वाहतूक शाखेचे निरीक्षक अरुण पवार, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, सागर चाळके, मिश्रीलाल जाजू, आदी उपस्थित होते.


नो पार्किंग झोन सध्या अस्तित्वात असलेले राहणार. त्याचबरोबर नवीन प्रस्तावित -मोठे तळे छाबडा कॉर्नर ते नगर भूमापन कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजूस. सायलन्स झोन नारायण टॉकीज ते राजवाडा चौक रस्ता.
नवीन प्रस्तावित पार्किंग सुंदर बागेच्या पूर्व बाजू कंपौंडलगत चार चाकी पार्किंग करणे व पश्चिम बाजू रोडलगत (रोड साईडला) दुचाकी पार्किंग.
अवजड वाहनांकरिता प्रमुख मार्गांवर बंदी. शहरातील अवजड वाहनांकरिता यापूर्वी असलेल्या नियमांत बदल करून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना छत्रपती शिवाजी पुतळा ते मलाबादे चौक ते नारायण चित्रमंदिर या प्रमुख रस्त्यांवर बंदी घालण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तू, किराणा माल वाहतुकीसाठी आवश्यक अवजड वाहनांना दुपारी २ ते ४ व रात्री साडेआठ ते सकाळी आठ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.


ट्रॅव्हलर्स व ट्रान्स्पोर्ट पार्किंग शहरातील मुख्य रोडवर ट्रॅव्हलर्स व ट्रान्स्पोर्ट कार्यालय असल्याने लक्झरी बस व ट्रक वाहतुकीस अडथळा होईल असे रस्त्याकडेला उभे केले जातात. त्यामुळे या कार्यालयांना थोरात चौक येथील शॉपिंग सेंटरचे गाळे भाड्याने देऊन तेथील रिकाम्या जागेत वाहने पार्किंग केली जातील, असे नियोजन करणे. हॉकर्स झोन इस्टेट विभागातील एकूण २६ हॉकर्स झोनपैकी दहा हॉकर्स झोन मंजूर झाले आहे.

शासनाने प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केलेला आराखडा
शहरातील सिग्नल व्यवस्था : सध्या सुरू असलेले सिग्नल राहणार, तसेच राजवाडा चौकातील सिग्नल व्यवस्था नवीन बसविण्याबाबतची निविदा मागविण्यात आली आहे. नव्याने सिग्नल बसविणे आवश्यक असलेली ठिकाणे (प्रस्तावित) - थोरात चौक, डेक्कन चौक, महासत्ता चौक (सांगली रोड, जुना नाका), संभाजी चौक. सध्या अस्तित्वात असलेले पाच एकेरी मार्ग राहणार, नवीन प्रस्तावित समावेश नाही. पी १- पी २ सम-विषम तारखेप्रमाणे पार्किंग (प्रस्तावित) - छत्रपती शाहू पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा ते मोठा मेन रोड, हॉटेल तारा ते दक्षिणेस हॉटेल नाईस रस्ता, शाहीर आण्णा भाऊ साठे पुतळा ते थोरात चौक ते वर्धमान चौक रस्ता, थोरात चौक ते विक्रमनगर रस्ता, मेन रोड शॉपिंग सेंटर इमारत ते व्यंकटराव हायस्कूल ते भिडे दवाखाना, हॉटेल सोनाली ते शिक्षक कॉलनी रस्ता, आराधना क्लॉथ (ऐतवडे घर) ते बॅँक आॅफ इंडिया रस्ता, नगरभूमापन आॅफिस ते नारायण टॉकीजकडे जाणाऱ्या रोडवर डाव्या बाजूस पार्किंग झोन वरीलप्रमाणे पार्किंग झाल्यास वाहतुकीत सुसूत्रता येईल.

Web Title: Ichalkaranjat Transportation Discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.