इचलकरंजीत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया!

By admin | Published: February 21, 2017 01:20 AM2017-02-21T01:20:33+5:302017-02-21T01:20:33+5:30

पालिका सभेत प्रस्ताव : जैविक खतनिर्मिती करण्याची पुणे येथील संस्थेची तयारी

Ichalkaranjat waste wastewater process! | इचलकरंजीत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया!

इचलकरंजीत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया!

Next

इचलकरंजी : शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचरा डेपोवर हजारो टन कचरा साचला असताना दररोज जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जैविक खतनिर्मिती करण्याची तयारी पुणे येथील एका संस्थेने दाखविली आहे. दररोज दहा टन कचऱ्यावर संस्थेने प्रक्रिया करण्याचा प्रयोग यशस्वी केला तर नगरपालिकेच्यावतीने त्या संस्थेला ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वाने प्रकल्प उभारण्यास मंजुरी मिळेल. त्यामुळे शहरात दररोज मिळणाऱ्या ७० टन वजनाच्या कचऱ्याची विल्हेवाट लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
आसरानगरजवळ शहरातील कचरा एकत्रित गोळा करून टाकण्यात येणारा कचरा डेपो आहे. त्या ठिकाणच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत, विटा, इंधन व भंगार तयार करण्याचा प्रकल्प नवी मुंबई येथील हायड्रो टेक या संस्थेने सन २००६ मध्ये उभारला आहे. त्यावेळी सदर प्रकल्पामध्ये दररोज ८० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता होती. त्याप्रमाणे या संस्थेने तीन वर्षे हा प्रकल्प चालविला. त्यानंतर मात्र प्रकल्प चालविण्यामध्ये नुकसान येऊ लागल्याने हा प्रकल्प बंद पडला. नगरपालिकेकडून या संस्थेला नोटिसा देण्यात आल्या. तसेच हा प्रकल्प चालू ठेवावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सध्या या संस्थेने दररोज आठ तास प्रकल्प चालू ठेवून ३० टन इतक्याच कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.
सद्य:स्थितीला इचलकरंजी शहरात दररोज १३० ते १४० टनपर्यंत कचरा जमा होत असतो. मात्र, या सर्व कचऱ्यांवर प्रक्रिया होत नसल्याने हजारो टन कचरा या डेपोवर साचून राहू लागला आहे. साचलेल्या कचऱ्यास वारंवार आग लागण्याचे प्रकार होत असून, त्यामुळे आसपासच्या नागरी वसाहतींना त्रास होत आहे. म्हणून या नागरिकांकडून आंदोलने केली जात आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे येथील श्री इंजिनिअर्स या संस्थेने इचलकरंजीतील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून जैविक खतनिर्मिती करण्याची तयारी दर्शवली. या संस्थेला नगरपालिकेने योग्य ते निकष लावून घनकचरा प्रक्रिया करण्यास मंजुरी द्यावी, अशा आशयाचे शिफारस पत्र खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे. त्यामुळे या संस्थेस दररोज दहा टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी द्यावी, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या २२ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेसमोर चर्चेस ठेवण्यात आला आहे. दहा टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास या संस्थेला यश आले तर त्या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यास मंजुरी दिली जाणार आहे. परिणामी शहरातील आठवडी बाजार, खानावळी, उपाहारगृहे, फेरीवाले, आदी ठिकाणी तयार होणाऱ्या दररोजच्या ७० टन वजनाच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा नगरपालिका प्रशासनास वाटत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ichalkaranjat waste wastewater process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.