इचलकरंजीत पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:31 AM2017-11-08T00:31:33+5:302017-11-08T00:35:59+5:30

इचलकरंजी : वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा इचलकरंजीच्या नळ पाणीपुरवठा योजनेला होणारा तीव्र विरोध पाहता ही नळ योजना नजीकच्या दोन वर्षांत होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

 Ichalkaranjat water scarcity crisis | इचलकरंजीत पाणी टंचाईचे संकट

इचलकरंजीत पाणी टंचाईचे संकट

Next
ठळक मुद्देकृष्णा योजनेची दाबनलिका बदलण्याची गरज : वारणा नळ योजना होण्याची शक्यता धूसरअन्यथा उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार योजनेला होणारा तीव्र विरोध पाहता ही नळ योजना नजीकच्या दोन वर्षांत होण्याची शक्यता धूसर

इचलकरंजी : वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा इचलकरंजीच्या नळ पाणीपुरवठा योजनेला होणारा तीव्र विरोध पाहता ही नळ योजना नजीकच्या दोन वर्षांत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. सध्या शहरास पाणी पुरवठा करणाºया कृष्णा योजनेची दाबनलिका व पाणी उपसा पंप बदलले तर नागरिकांना आवश्यक तितके पाणी मिळेल, अन्यथा उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी कृष्णा व पंचगंगा अशा दोन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी पंचगंगा नळ योजनेकडील पाणी उपशाचे पंप ४० वर्षांपूर्वीचे असल्यामुळे त्यांची क्षमता कमी झाली आहे. तसेच कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका सडल्यामुळे तिला वारंवार गळती लागते. याचा परिणाम म्हणून शहराचा पाणीपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे कृष्णा नळ योजनेकडील किमान सहा किलोमीटर लांबीची दाबनलिका ताबडतोब बदलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कृष्णा नळ योजनेचे पंप सुद्धा सुमारे पंधरा वर्षांपूर्वीचे असल्याने त्यांचीही क्षमता कमी झाली आहे.

इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे. शहरास दररोज पाणीपुरवठा करायचा असल्यास दररोज ५४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. मात्र, पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नळ योजनांकडील पंपांची क्षमता कमी झाल्यामुळे जेमतेम ३५ दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीस शहराला तीन दिवसांतून एकवेळ पाणी पुरविले जाते. जानेवारी महिन्यापासून पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषणाची पातळी वाढते. त्यामुळे पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवावी लागते. जानेवारी ते जून असे सहा महिने शहरास चार ते पाच दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यामध्ये कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेस गळती लागली, तर आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. याला पर्याय म्हणून पंचगंगा व कृष्णा योजनांकडील पंप बदलून तेथे नवीन पंप बसविले पाहिजेत. तर किमान सहा किलोमीटर लांबीची दाबनलिका बदलणे, अशा कामांसाठी सरकारकडून खास बाब म्हणून वीस कोटींहून अधिक रकमेचा निधी मिळविणे आवश्यक आहे.

अन्यथा वारणा नळ योजना पूर्ण होईपर्यंत शहरवासीयांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, सध्या वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा इचलकरंजीच्या नवीन नळ योजनेला होणाºया विरोधाची तीव्रता पाहता नजीकच्या दोन-तीन वर्षांत नळ योजना पूर्ण होईल, असे वाटत नसल्याने विरोधी नगरसेवकांबरोबरच सत्तारूढ पक्षाचे नगरसेवकसुद्धा पंचगंगा व कृष्णा योजनेचे पंप बदलावेत. त्याचबरोबर कृष्णा योजनेची दाबनलिका बदलावी, अशी मागणी करू लागले आहेत.

आमदार व खासदारांची प्रतिष्ठा पणाला
कृष्णा व पंचगंगा नळ योजनेचे पंप व कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून त्याचा पहिला हप्ता नगरपालिकेकडे पाठविला होता. वास्तविक पाहता पंप व दाबनलिका बदलणे याची निविदा प्रसिद्ध करून त्याप्रमाणे काम चालू होणे आवश्यक होते; पण त्याला विलंब लागला. आता इचलकरंजीस वारणा नळ योजनेस मंजुरी दिली असून, तिच्या निविदांना सुद्धा मान्यता दिली आहे. म्हणून कृष्णा योजनेची दाबनलिका आणि पंप बदलणे आवश्यक नाही. परिणामी, नगरपालिकेकडील शासनाने दिलेला निधी पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आला. तर नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी पाठविलेला दाबनलिका व पंप बदलण्याबाबतचा सोळा कोटी रुपयांचा प्रस्तावसुद्धा शासनाने फेटाळला आहे. आता वारणा नदीकाठच्या आंदोलनामुळे वारणा नळ योजना नजीकच्या दोन-तीन वर्षांत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे इचलकरंजीवासीय मात्र दुहेरी कात्रीत सापडले आहेत. तरी सध्याचे आमदार सुरेश हाळवणकर व खासदार राजू शेट्टी यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न करून पंप व दाबनलिका बदलण्यासाठी निधी आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title:  Ichalkaranjat water scarcity crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.