इचलकरंजीत झोपडपट्टीवासीयांचा अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: October 6, 2015 12:10 AM2015-10-06T00:10:01+5:302015-10-06T00:27:38+5:30
अतिक्रमण प्रश्न : घरकुलांच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
इचलकरंजी : केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येथील नेहरूनगरमध्ये घरकुले बांधण्यात येत आहेत. घरकुलांच्या इमारती बांधण्यासाठी रिकामे करण्यात आलेल्या जागेवर काही लोकांकडून अनधिकृतपणे बांधकामे व झोपड्या उभारल्या आहेत. त्या ताबडतोब हटवून तेथे घरकुलांच्या इमारती बांधाव्यात, अशा आशयाच्या मागणीसाठी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली नेहरूनगर झोपडपट्टीवासीयांनी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना सुमारे तासभर घेराव घातला.
केंद्र सरकारच्या अनुदान योजनेतून नेहरूनगर येथे झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुले बांधण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. सध्या ४८ घरकुलांची एक इमारत पूर्ण झाली आहे, तर आणखीन ५८८ घरकुलांच्या इमारती बांधणे आवश्यक आहे. या इमारती बांधण्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी या झोपडपट्टी ठिकाणी असलेली अन्य अतिक्रमणे नगरपालिकेच्या पथकाकडून दूर करण्यात आली होती. रिकाम्या जागेवर आणखीन तीन इमारतींचे बांधकाम संबंधित मक्तेदाराकडून सुरू करण्यात आले नसल्याने त्या ठिकाणी आता काही झोपड्या व अन्य प्रकारची अतिक्रमणे सुरू झाली आहेत. ती ताबडतोब हटवावीत, या मागणीसाठी नेहरूनगरमधील महिला-पुुरुष नागरिकांनी सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांना घेराव घातला. या आंदोलनामध्ये बेबी पवार, विजया कांबळे, जैबुन शेख, गोदाबाई माळगे, जयश्री तलवार, रुक्मिणी ऐवाळे, गीताबाई भोसले, अनिल धजनावळे, हणमंत माने, किरण गेजगे, महंमद खान, अब्दुल पिरजादे, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
बंदोबस्तात अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय
झोपडपट्टीवासीयांच्या वतीने नगरसेवक आवळे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, आदींनी यावेळी चर्चा केली. तेव्हा नजीकच्या काळात बंदोबस्त घेऊन अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सध्या ४८ घरकुलांमध्ये लाभार्थी असलेल्या मृतांच्या वारसदारांना पाण्याची नळ जोडणी व वीज जोडणीसाठी ना हरकत दाखला देण्याचा विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेऊन दाखले देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.