इचलकरंजीत संतप्त महिलांचा हल्लाबोल
By admin | Published: January 7, 2017 01:18 AM2017-01-07T01:18:26+5:302017-01-07T01:18:26+5:30
मायक्रो फायनान्स कार्यालयांची मोडतोड : कर्मचाऱ्यांना धरले धारेवर; चप्पल, बूट, फायली भिरकावल्या
इचलकरंजी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील संगीता काटे या महिलेच्या आत्महत्येचे पडसाद शुक्रवारी इचलकरंजीत उमटले. शहरातील दोन मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयावर मनसे महिला मंडळ व बचत गटाच्या महिलांनी हल्ला केला. यामध्ये कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, टेबल यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शंभर ते दीडशे महिलांच्या जमावाने केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली.
रेंदाळ येथील संगीता काटे यांनी एका मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. यंत्रमाग व्यवसायातील मंदी व नोटाबंदी या कारणांमुळे आर्थिक उलाढाल मंदावल्याने कर्जाचे हप्ते भरण्यास विलंब झाला. मात्र, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जाच्या हप्त्यासाठी दररोज तगादा लावला जात होता. दिवस-दिवसभर हे कर्मचारी कर्ज वसुलीच्या नावाखाली घरात बसून राहत होते. या त्रासाला कंटाळून संगीता यांनी गुरुवारी आत्महत्या केली, असे संगीताच्या नवऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील जनलक्ष्मी फायनान्स कंपनी (भाग्यरेखा टॉकीजजवळ) व ऐक्विटास स्मॉल फायनान्स कंपनी (दाते मळा) या दोन्ही कंपन्यांवर बचत गटाच्या महिला व मनसेच्या पदाधिकारी महिलांनी एकत्रित हल्ला चढविला. तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारत त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी झालेल्या वादविवादानंतर महिलांनी रौद्ररूप धारण केले. चपला, बूट फेकून मारत कार्यालयातील फायली भिरकावल्या. टेबल, खुर्च्या, टीव्ही, कॉम्प्युटर यांसह अन्य साहित्यांची तोडफोड केली.
महिलांच्या जमावाने घातलेल्या धुडगुसामुळे शहरातील मायक्रोफायनान्स कंपनीसह सावकारांचे धाबे दणाणले आहेत. शहरात डझनभर मायक्रोफायनान्स कंपन्या असून, कर्जपुरवठ्याच्या नावाखाली महिला बचत गटांना साखळीमध्ये कर्ज देऊन एखादी महिला कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असेल, तर साखळीतील अन्य महिलांकडून जादा रक्कम घेऊन त्या महिलेचेही कर्ज वसूल केले जाते. त्यामुळे नाईलाजास्तव महिला या फासात अडकत जातात, असे आरोपही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)
वसुलीसाठी दमदाटी
संतप्त झालेल्या महिलांच्या भावना तीव्र होत्या. वसुलीच्या नावाखाली महिलांना घरी जाऊन दमदाटी केली जाते. घरातील भांडी गोळा करतो, सोने गहाण ठेवा आणि आमचे कर्ज भागवा; अन्यथा आत्महत्या करा, असे बोलले जाते. या प्रकारामुळे महिला धास्तावल्या असून, आत्महत्येसारखे विचार मनात येत आहेत. त्यातूनच संगीता यांनी आत्महत्या केली, असा आरोप केला.