इचलकरंजीत दोघा घरफोड्यांना अटक
By admin | Published: May 29, 2014 01:20 AM2014-05-29T01:20:15+5:302014-05-29T01:27:51+5:30
अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त : शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी : शहरातील गावभाग आणि शिवाजीनगर, तसेच हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सहा घरफोड्यांचा छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३९७ ग्रॅम सोने, १० मोबाईल, कॅमेरा आणि चांदीच्या वस्तू असा अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र धनाजी सूर्यवंशी (वय २८, रा. आळते) व नंदू प्रभाकर कांबळे (२८, रा. खोतवाडी) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकारांना सांगितले. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांचा तपास तातडीने करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. हा तपास करीत असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या पथकाने रवींद्र सूर्यवंशी व नंदू कांबळे या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी इचलकरंजी व हातकणंगले परिसरात केलेल्या सहा घरफोड्यांची कबुली दिली. यामध्ये गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, शिवाजीनगरच्या हद्दीत एक व हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी आरोपींकडून ३९७ ग्रॅम सोने, त्यामध्ये पाच नाणी व दोन मंगळसूत्र, पाटल्यांसह चांदीचे तबक, कलश व दहा मोबाईल संचांसह अन्य दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच विदेशी चलन व गुन्ह्यात वापरलेली कटावणीही जप्त करण्यात आली आहे. संबंधित मुद्देमाल या दोघाही चोरट्यांनी स्वत:च्या घरात पुरून ठेवला होता. या सहा घरफोड्यांमध्ये सुमारे साडेसात लाखांची रोख रक्कमही चोरट्यांनी लांबवली होती. मात्र, ती मिळून आली नाही. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढोणे, पो. कॉ. वैभव दड्डीकर, विष्णू शिंदे, विकास कुरणे, महादेव घाटगे, अरिफ वडगावे, आदींनी केली. (प्रतिनिधी)