इचलकरंजीत कापड गोदामास भीषण आग

By admin | Published: August 14, 2015 11:55 PM2015-08-14T23:55:28+5:302015-08-14T23:55:28+5:30

दहा कोटींचे नुकसान : पत्रे उडाले; भिंतींना तडे

Ichalkaranjeet cloth godmaas heavy fire | इचलकरंजीत कापड गोदामास भीषण आग

इचलकरंजीत कापड गोदामास भीषण आग

Next

इचलकरंजी : येथील वखार भाग परिसरात असलेल्या भिकुलाल दगडूलाल मर्दा यांच्या कापडाच्या दुमजली गोदामाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत सुमारे १० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. आग विझविण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील सुमारे शंभराहून अधिक अग्निशमन दलांनी पाण्याचा मारा केला. रात्रीच्या सुमारास लागलेली आग सुमारे दहा तासांपर्यंत धुमसत होती.वखार भाग परिसरात भिकुलाल मर्दा यांचे अरविंद हाऊस या नावाची दुमजली इमारत आहे. याठिकाणी खालच्या मजल्यावर पाठीमागील बाजूस कापडाचे गोदाम, तर समोर व वरच्या मजल्यावर कार्यालय आहे. याठिकाणी त्यांच्या विविध उद्योगातील अनेक क्वॉलिटीचे प्रक्रिया केलेले तयार कापड पॅकिंग केले जाते. त्यांचा अरविंद नावाचा ब्रॅण्ड असून, या ठिकाणाहून तो देशभरात पाठवला जातो. शहर व परिसरातील सर्वात जुने व प्रसिद्ध उद्योजक म्हणून मर्दा यांची ओळख आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गोदामातून धूर व आगीचे लोट येत असल्याचे रखवालदार व शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. तसेच घटनेची माहिती मर्दा यांनाही दिली. गोदामात मोठ्या प्रमाणात पॅकिंग कापडाचे गठ्ठे असल्याने आग मोठ्या प्रमाणात फैलावत गेली. आग विझविण्यासाठी शहर व परिसरातील सर्व अग्निशामक दलाच्या बंबांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिक गोदामातील महत्त्वाची कागदपत्रे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.
पहिल्या मजल्यावर मोठा कापड साठा असल्याने आग आटोक्यात येत नव्हती, तर आगीचे लोळ दुसऱ्या मजल्यावरही पोहोचल्याने वरील कापडाच्या गाठी, तसेच कार्यालयातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग धुमसत असल्याने धुराचे लोट उंचच्या उंच दिसत होते. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की गोदामातील लोखंडी कपाट, छताचे लोखंडी चॅनेल वितळून वाकले होते. तर आगीच्या तीव्रतेने छताचे पत्रे फुटून उडून गेले. कॉँक्रिटच्या भिंतींना तडे जाऊन भिंती पडत होत्या. आगीच्या झळांनी परिसरातील झाडांची पाने करपली होती. मोठ्या प्रमाणात एकावर एक असा कापड गाठींचा साठा असल्याने पाण्याचा मारा करूनही आग विझवण्यास अडथळे येत होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास जेसीबीच्या साहायाने भिंती पाडून गोदामातील साहित्य बाहेर काढण्यात येत होते. सुमारे दहा तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही आग विझविण्यासाठी शंभराहून अधिक बंबांद्वारे जवानांनी पाण्याचा मारा केला. या घटनेत गोदामाचे शटर, खिडक्या, तसेच अन्य साहित्यांसह कापड गाठी असे सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. (वार्ताहर)


अग्निशमन पथके दाखल
इचलकरंजीसह कोल्हापूर महापालिका, जयसिंगपूर, वडगाव नगरपालिका, घोडावत उद्योग समूह, जवाहर साखर कारखाना, दत्त कारखाना, पंचगंगा कारखाना, पार्वती औद्योगिक वसाहत, आदी ठिकाणचे अग्निशमन दल बंबासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
नेते घटनास्थळी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Web Title: Ichalkaranjeet cloth godmaas heavy fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.