इचलकरंजीत खड्ड्यांची शर्यत संपता संपेना

By admin | Published: March 16, 2017 12:24 AM2017-03-16T00:24:01+5:302017-03-16T00:24:01+5:30

२0 कोटी खर्चूनही खड्डे कायम : ‘खड्डा दाखवा बक्षिस मिळवा’ म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी फेरफटका मारावा

Ichalkaranjeet to finish the race of potholes | इचलकरंजीत खड्ड्यांची शर्यत संपता संपेना

इचलकरंजीत खड्ड्यांची शर्यत संपता संपेना

Next

  अतुल आंबी ल्ल इचलकरंजी ‘रस्त्यावर खड्डा दाखवा आणि बक्षिस मिळवा’ म्हणणाऱ्या राज्यातील क्रमांक २ चे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी इचलकरंजी शहरातील मुख्य मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात फेरफटका मारावा, अशी मिश्कीलपणाने शहरातील नागरिकांकडून टीका केली जात आहे. २0 कोटी रुपयांच्या विशेष रस्ता अनुदानातून शहरातील रस्ते करणार असल्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यानी केली होती. मात्र, हे मुख्य रस्ते पूर्ण झाले नसून, बरेच रस्ते प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शहरवासीयांची खड्ड्यांच्या अडथळ्यांची शर्यत अद्याप संपलेली नाही. इचलकरंजी शहरासाठी अंतर्गत भुयारी गटार योजना मंजूर झाली आणि नगरपालिकेने संपूर्ण शहरातील रस्ते खुदाई करून पाईपलाईनचे काम केले. या योजनेतील कामात कुचराई झाल्याने रस्त्यांचाही बोजवारा उडाला. त्यानंतर नगरपालिकेने टेंडर काढून हे सर्व रस्ते केले. मात्र, टक्केवारीच्या कामकाजामुळे रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट बनला. पहिल्या पावसातच रस्ते अक्षरश: पाण्याबरोबर धुऊन गेले आणि पहिल्यापेक्षा रस्त्यांची अवस्था बिकट बनली. अशा बिकट रस्त्यावरून कसरत करीत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत होते. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात घडले. शहरातील कित्येक नागरिकांनी जीव गमावला. शहरातील विविध सामाजिक संघटनांसह नागरिकांनी रस्त्यासाठी नगरपालिकेवर मोर्चे काढले, आंदोलने केली. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची जबाबदारी नगरपालिकेवर घालून मुख्याधिकारी व नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रस्त्यांच्या कामाचा भूलभुलय्या शहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी पुतळा ते ईदगाह मैदान, कोल्हापूर रोडवरील हॉटेल चेतना पासून कबनूर नाका, संभाजी चौक ते मरगुबाई मंदिर, छत्रपती शिवाजी पुतळा ते राजवाडा मार्गे मरगुबाई मंदिर, राजवाडा ते सांगली नाका, डेक्कन चौक ते पंचगंगा पेट्रोल पंप, आंबेडकर पुतळा ते रिंग रोड या मार्गावरील रस्ते झाले नाहीत. हे परिसर वगळता याच मार्गावरील पुढील रस्ता झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचा भूलभुलय्या झाल्याचे बोलले जात आहे. वारंवारच्या आंदोलनानंतर संबंधित मक्तेदारांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते आणि वातावरण शांत झाल्यानंतर हे प्रकरणही हळूहळू शांत करण्यात आले. या रस्त्याच्या कामातील साखळी पद्धतीमुळे दोषी कोणाला ठरवायचे, असा प्रश्न पडल्यानेच हे चौकशी प्रकरण शांत केल्याचे उघडपणाने बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुरेश हाळवणकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करून शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी २0 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. नगरपालिकेच्या कामकाजाची पार्श्वभूमी पाहता त्यानी ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला. त्यावरही जोरदार टीकाटिप्पणी झाली. सरते शेवटी शहरातील रस्त्यांचे कामही सुरू झाले. शहरातील विविध भागांत वेगवेगळ्या मक्तेदारांमार्फत धुमधडाक्यात रस्ते करण्यास सुरूवात झाली. मात्र, सापशिडीप्रमाणे अधले-मधले रस्ते होत असल्याने नेमका कुठला रस्ता कुठेपर्यंत होणार आहे? याबाबत कोणालाच काही समजेना. आता जवळपास सर्वच रस्त्यांचे काम संपले आहे. मात्र, प्रमुख मार्गांवरील अनेक खड्डे तसेच आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्त्यावर खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा केली होती. याला दुसरे वर्ष उलटले तरी इचलकरंजीतील खड्डे अद्याप तसेच आहेत. त्यामुळे मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांप्रमाणे आपल्या निधीतील काही निधी विशेष बाब म्हणून इचलकरंजीला द्यावा आणि राहिलेले रस्ते पूर्ण करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Ichalkaranjeet to finish the race of potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.