इचलकरंजीत गोदामाला आग

By Admin | Published: November 12, 2016 11:03 PM2016-11-12T23:03:52+5:302016-11-13T01:13:14+5:30

२५ कोटींचे नुकसान : सुमारे १० ते १५ हजार सुताचे बॉक्स जळून खाक

Ichalkaranjeet godown fire | इचलकरंजीत गोदामाला आग

इचलकरंजीत गोदामाला आग

googlenewsNext

इचलकरंजी : येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत सूत गोदामाला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. यामध्ये सुमारे १० ते १५ हजार सुताचे कार्टन (बॉक्स) जळून खाक झाले असून, इमारत व इतर साहित्य असे सुमारे २५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इचलकरंजीसह कोल्हापूर, सांगली, जयसिंंगपूर, कुरुंदवाड, आदी भागातील अग्निशमन दलाच्या ११ पथकांद्वारे आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले. या आगीचे तांडव बारा तासांनंतरही कायम होते. आगीचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेले श्रीराम कुंज हे १४ हजार स्क्वेअर फूट जागेतील बंदिस्त गोदाम (वेअर हाऊस) जुगलकिशोर तिवारी (रा. जवाहरनगर) यांनी वर्षभरापूर्वी भाडेतत्त्वावर घेतले आहे. या गोदामात कॉटन, पॉलिस्टर, आदींसह विविध प्रकारच्या सुताचे कोन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या गोदामातून धुराचे लोट येऊ लागल्याने नागरिकांनी याची माहिती तिवारी यांच्यासह अग्निशामक दलास दिली. नागरिकांनी गोदामाचे शटर फोडून काही प्रमाणात सुताचे बॉक्स बाहेर काढले.
माहिती मिळताच नगरपालिकेचे चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, कॉटन व पॉलिस्टर सुतामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा इमारतीच्या बाहेर येऊ लागल्याने तसेच आग आटोक्यात येत नसल्याने परिसरातील अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले. सुमारे ११ पेक्षा अधिक बंबांद्वारे शंभराहून अधिक फेऱ्यानंतरही आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे जेसीबी यंत्राच्या मदतीने इमारतीच्या भिंंती पाडल्या.
एकमेकांवर रचून ठेवण्यात आलेल्या बॉक्समुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत होती. त्यामुळे इमारतीच्या पिछाडीचा भागही पाडण्यात आला. आगीच्या धगीमुळे छतही कोसळले. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग शनिवारी सायंकाळपर्यंत धुमसत होती. आगीत गोदामाच्या कार्यालयासह संपूर्ण इमारत व सुताचे १५ हजार कार्टनसह साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी भेट देऊन पाहणी केली. खंजिरे औद्योगिक वसाहत परिसरात श्रीराम कुंज हे सर्वांत मोठे गोदाम असल्याने याठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुताचा साठा ठेवला होता. आगीची माहिती समजताच व्यापाऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती. गोदाम चालक तिवारी हे औरंगाबाद येथे गेले असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. (वार्ताहर)


अकरा बंबांच्या शंभराहून अधिक फेऱ्या
भीषण आगीमुळे येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्यांसह कुरुंदवाड, जयसिंंगपूर, कोल्हापूर, सांगली, पंचगंगा, शरद साखर कारखान्यांकडील अग्निशामक दलांनाही पाचारण करण्यात आले.
सुमारे अकरा बंबांद्वारे शंभराहून अधिक फेऱ्या पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आली.
लोखंडी अ‍ॅँगल वाकून छत कोसळले
आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, त्यामुळे गोडावूनचे लोखंडी अ‍ॅँगल वाकले. तसेच छतही कोसळले. त्यामुळे गोडावूनच्या इमारतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
सुमारे सतरा तासांहून
अधिक काळ मदतकार्य
४शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ती आग विझविण्यासाठी मदतकार्य सुरूच होते.
४परिसरातील नागरिकांसह अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते.


इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत सूत गोदामाला शुक्रवारी मध्यरात्री आग लागून सुमारे १० ते १५ हजार सुताचे बॉक्स जळून खाक झाले. यात इमारत व इतर साहित्य असे सुमारे २५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: Ichalkaranjeet godown fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.