इचलकरंजीत ‘कपबशी’चा घोळ

By admin | Published: November 17, 2016 12:19 AM2016-11-17T00:19:01+5:302016-11-17T00:19:01+5:30

एकच चिन्ह मिळाल्याने गोंधळ : नगराध्यक्षपदासाठी अपक्षाला कपबशी मिळाल्यामुळे अधिक संभ्रम

Ichalkaranjeet 'Kakabashi' rush | इचलकरंजीत ‘कपबशी’चा घोळ

इचलकरंजीत ‘कपबशी’चा घोळ

Next

राजाराम पाटील --इचलकरंजी --येथील पालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रभागनिहाय चिन्ह वाटपाच्या पद्धतीमुळे निवडणुकीतील त्रस्त विरोधी दोन आघाड्यांना २८ ठिकाणी कपबशी हे समान चिन्ह मिळाल्याने मोठा घोळ निर्माण झाला आहे. ताराराणी व राजर्षी शाहू अशा दोन आघाड्या जिल्हास्तरावर नोंदणीकृत असल्या तरी दोन्हीही आघाड्यांकडे ठरावीक चिन्हाचे आरक्षण नाही. त्यातच नगराध्यक्षपदाच्या एका अपक्ष उमेदवाराला सुद्धा कपबशीचे चिन्ह मिळाले असल्याने गोंधळात आणखीन वाढ झाली आहे.
पालिकेच्या निवडणुकीसाठी पूर्वघोषित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ११ नोव्हेंबर व चिन्ह वाटपासाठी १२ नोव्हेंबर या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या; पण नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी एका उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. त्यामुळे त्याने जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी होऊन त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. तसेच नगरसेवकपदासाठी ५ ब, ९ ब, १७ ब, २० ब, २५ ब व २८ ब या प्रभागांमध्ये सुद्धा वाद निर्माण झाल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यांचेही निर्णय झाले; पण निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगराध्यक्षपदाबाबत ज्या नगरपालिकांमध्ये न्यायालयीन वाद निर्माण झाला आहे, त्यांच्यासाठी माघारीची मुदत पुढे ढकलण्यात आली. परिणामी इचलकरंजीमध्ये न्यायप्रविष्ट असलेल्या प्रभागात माघारीची मुदत मंगळवारी संपली आणि बुधवारी त्याबाबतचे चिन्ह वाटप करण्यात आले.
ताराराणी आघाडीची युती भाजपबरोबर आहे, तर राजर्षी शाहू आघाडीची युती राष्ट्रीय व राष्ट्रवादी या दोन कॉँग्रेसबरोबर आहे. ताराराणी व शाहू या दोन्ही आघाड्यांना जिल्हास्तरावर नोंदणी असली तरी त्यांची चिन्हे आरक्षित नाहीत. या निवडणुकीमध्ये ताराराणी आघाडी नगरसेवकपदाच्या वीस जागा, तर शाहू आघाडी पंधरा जागा लढवीत आहेत. दोन्ही आघाड्यांकडील उमेदवारांनी अर्ज दाखल करताना प्रथम पसंतीचे चिन्ह म्हणून कपबशीची मागणी
केली होती. नगरपालिकेच्या निवडणुकीतील चिन्ह वाटपावेळी प्रभागनिहाय चिन्ह वाटप करण्यात यावे, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे प्रभागनिहाय चिन्ह वाटप करताना दोन्ही आघाड्यांकडील उमेदवारांनी समान चिन्हाची मागणी केल्यामुळे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. या चिठ्ठ्यांमध्ये ताराराणी आघाडीकडील उमेदवारांना सोळा ठिकाणी कपबशीचे चिन्ह मिळाले,
तर दोन ठिकाणी किटली हे चिन्ह मिळाले आहे. त्याचबरोबर शाहू आघाडीकडील उमेदवारांना पंधरापैकी बारा ठिकाणी कपबशीचे चिन्ह मिळाले आणि एका ठिकाणी शिट्टी हे चिन्ह त्यांच्या पदरी पडले. अशा प्रकारे ताराराणी आणि शाहू या दोन्ही आघाड्या परस्परविरोधी पक्षाकडून उभ्या असल्या तरी दोन्ही आघाड्यांकडील उमेदवारांना कपबशी हे एकच चिन्ह मिळाले असल्यामुळे एकूणच त्या संबंधित प्रभागात प्रचार करताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांची चिन्ह पटवून देण्यासाठी भंबेरी उडाली आहे. अशा या गोंधळातच उमेदवार व त्यांच्या समर्थकांना प्रचार यंत्रणा चालविताना मतदारांकडून आपले चिन्ह चांगलेच घटवून घ्यावे लागणार आहे.


उमेदवारीचा घोळ अंगलट आला
उमेदवारी अर्ज दाखल करताना परस्परविरोधी पक्षातून आघाड्या किंवा गट उभा राहणार असतील तर संबंधित आघाड्या व गटाकडील नेतेमंडळींकडून चिन्हाचा गोंधळ उडणार नाही, यासाठी सामंजस्य दाखवले जाते. दोन्ही बाजूंकडे एकच चिन्ह मिळावे, यासाठी चर्चा होऊन तसा निर्णय घेतला जातो. मात्र, इचलकरंजीमध्ये राजकीय पक्षाबरोबर युती करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोठा घोळ सुरू होता. या गोंधळाच्या वातावरणात संबंधित आघाड्या - गटाकडील नेतेमंडळींना चिन्हाची आठवणच राहिली नाही आणि नेमका त्यावेळचाच घोळ आज अंगलट आला असल्याची चर्चा राजकीय जाणकारांत आहे.
नगराध्यक्षपदासाठी सात, तर नगरसेवकपदासाठी २१८ उमेदवार
इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी सात, तर ६२ नगरसेवकपदासाठी २१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी ४० उमेदवार राष्ट्रीय कॉँग्रेस, ८ उमेदवार राष्ट्रवादी कॉँग्रेस, १५ उमेदवार शाहू आघाडी, ३९ उमेदवार भाजप, २३ उमेदवार ताराराणी आघाडी, २४ उमेदवार शिवसेना, १ उमेदवार एमआयएम, ३ उमेदवार माकप, १ उमेदवार भाकप, १ उमेदवार जनता दल, २ उमेदवार भ्रष्टाचारविरोधी जनक्रांती, २ उमेदवार रासप, तर ६१ उमेदवार अपक्ष आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपा कॉँग्रेस, शिवसेना व एमआयएम यांचा प्रत्येकी एक व तीन अपक्ष उमेदवार उभे आहेत.


आता निवडणूक प्रचारात गती
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून बहुतांश उमेदवारांनी आपला प्रचार घरोघरी जाऊन सुरू केला आहे. त्यापैकी राजकीय पक्षांची चिन्हे निश्चित असल्याने या पक्षांकडील उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे; पण चिन्ह नसलेल्या उमेदवारांना प्रचाराची अडचण निर्माण झाली होती. आता अपक्षांसह सर्वच राजकीय पक्ष, आघाड्यांकडील उमेदवारांना चिन्हे मिळाल्यामुळे आजपासून निवडणूक प्रचारात गती निर्माण होईल.

Web Title: Ichalkaranjeet 'Kakabashi' rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.