इचलकरंजीत सोनाराचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 12:59 AM2016-10-24T00:59:54+5:302016-10-24T00:59:54+5:30
हल्लेखोर फरार : दुकानात घुसून हत्याराने डोक्यात वर्मी घाव
इचलकरंजी : शहरातील विकली मार्केटमध्ये एका सोनाराच्या दुकानात घुसून अज्ञाताने त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना रविवारी घडली. अनिल चंद्रकांत शिंदे (वय ३५, सध्या रा. पंत मळा, खानाज गल्ली) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेला. या खुनाची नोंद येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, विकली मार्केटच्या इमारतीत अनिल शिंदे यांचे परम गोल्ड नावाचे दुकान असून, या दुकानात सोन्या-चांदीचे टंच काढण्याचे काम केले जात असे. तसेच सोने व चांदी गाळून रिफाईन अशी कामे सुद्धा ते करत असत. मूळचे हेरवाड (ता. शिरोळ) येथील असलेले शिंदे गेली दोन वर्षे इचलकरंजीत राहत होते. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांच्याकडे शहरातील एका सराफाकडून दोन कामगार सोने रिफाईन करण्यासाठी आले होते. दुकानात जाताच शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब ही घटना शेजारच्या दुकानदारांना सांगितली. तसेच याबाबत दूरध्वनीवरून शिवाजीनगर पोलिसांनाही कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अनोळखी व्यक्तीने हातोडीसारख्या हत्याराने डोक्यात वर्मी घाव घातल्यामुळे ते गंभीररीत्या जखमी होऊन खाली पडले असावेत. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र तेथून पळून गेला. दुकानाच्या आतील बाजूस तयार करण्यात आलेल्या केबिनमध्ये खुनाचा हा प्रकार घडला. पोलिस आल्यानंतर खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी बाहेर पसरली. शिंदे यांच्याशी संबंधित व नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
अज्ञात हल्लेखोराने जाताना मात्र लोखंडी कपाटात असलेल्या सोन्याच्या काही चीजवस्तू चोरून नेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून, हल्लेखोराचा अंदाज घेतला जात आहे. चोरी किंवा आर्थिक देवघेव यातून हा खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला आहे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी व जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिस निरीक्षक सतीश पवार हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)