इचलकरंजीतील व्यापारी पेढ्या उद्यापासून पाच दिवस बंद
By Admin | Published: July 7, 2017 01:23 AM2017-07-07T01:23:16+5:302017-07-07T01:23:16+5:30
वस्त्रोद्योगातील सर्व घटकांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क---इचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी लागू करण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीत सुलभता आणावी, या मागणीसाठी उद्या शनिवार पासून शहर व परिसरातील सर्व व्यापारी पेढ्या पाच दिवस बंद ठेवण्याची घोषणा इचलकरंजी पॉवरलूम अँड यार्न मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी गुरुवारी व्यापाऱ्यांच्या बैठकीत केली.
सरकारने १ जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू केली असली तरी कमालीच्या संभ्रमावस्थेमुळे देशभरातील वस्त्रोद्योग केंद्रातील व्यापारी-व्यावसायिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजीतही कापड उत्पादनात घट झाली आहे. देशभरातील कापडाच्या पेठा बंद असल्याने इचलकरंजीतील कापडाची जावक ठप्प झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी मर्चंटस् असोसिएशनच्या सभागृहात व्यापाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीसाठी प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता, लक्ष्मीकांत मर्दा, महावीर जैन, राजाराम चांडक, जगदीश छाजेड, भंवरलाल चौधरी, आदींसह विविध घटकांमध्ये कार्यरत असलेले व्यापारी उपस्थित होते. बैठकीत पूनमचंद दरगड, भीमकरण छापरवाल, चंदनमल मंत्री, बालकिसन छापरवाल, आदींनी मते व्यक्त केली. सर्व व्यापाऱ्यांकडून जीएसटीला विरोध करण्यासाठी संपूर्णपणे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
आपल्या प्रमुख भाषणात असोसिएशनचे अध्यक्ष गांधी म्हणाले, सरकारने कॉटन व सिंथेटिक कापडावर कर लावण्यासाठी केलेला भेदभाव रद्द करून समानता आणावी. वस्त्रोद्योगामधील एकाच घटकावर जीएसटी लागू करावा. एक महिन्याऐवजी तीन महिन्यांला रिटर्न भरण्याची मुभा ठेवावी, अशा मागण्या आहेत. शहर व परिसरातील वस्त्रोद्योगातील सर्व घटकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करून सोमवारी (दि. १०) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. वस्त्रोद्योगातील सर्व घटकांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.
जीएसटी करप्रणालीत सुलभता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन
वस्त्रोद्योगातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन
प्रांताधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय
१२ जुलै रोजी आढावा बैठक
घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार