इचलकरंजी शहरात मोर्चेबांधणीला वेग
By Admin | Published: August 26, 2016 12:59 AM2016-08-26T00:59:05+5:302016-08-26T01:11:52+5:30
‘मॅँचेस्टर’ची हाळवणकरांशी चर्चा : कारंडे गटाची दिशा पुढील आठवड्यात
इचलकरंजी : नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असल्याने शहरातील राजकीय पक्ष व आघाड्यांच्या पातळीवर हालचालींना सुरुवात झाली आहे. मॅँचेस्टर आघाडीच्या बैठकीत शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी निर्णायक चर्चा करण्याचे निश्चित केले, तर राष्ट्रवादीतील कारंडे गटानेही आठवड्याभरात निर्णय घेऊन दिशा निश्चित करण्याचे ठरविले.
नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, दरम्यानच्या काळात जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय शासनाने घेतला. पावसाळी अधिवेशनानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात येऊन त्याप्रमाणे जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. परिणामी, नगराध्यक्ष निवडण्याची आरक्षणे बदलण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष निवडीची आरक्षणे जाहीर होताच संबंधित नगरपालिका क्षेत्रात असलेले राजकीय पक्ष व आघाड्या यामधील हालचालींना आणि मोर्चेबांधणीला वेग येईल, असा राजकीय जाणकारांचा व्होरा होता.
मात्र, शासनाकडून नगराध्यक्ष आरक्षणाच्या सोडती लांबणीवर पडल्या आहेत. आता नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अवघा तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या कालावधीमध्ये पक्ष किंवा आघाड्यांमधील राजकीय जुळवाजुळवीची समीकरणे तयार होणे आवश्यक आहे. त्यानंतर मोर्चेबांधणी होऊन इच्छुक नगरसेवकांची नावे निश्चित केली जातील. म्हणून नगराध्यक्ष आरक्षणाची वाट न पाहता संभाव्य पक्ष किंवा आघाड्यांशी चर्चा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर मॅँचेस्टर आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील नाट्यगृहाजवळील जलतरण तलावाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीसाठी नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, आघाडीचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव प्रकाश मोरबाळे, नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेविका मीना बेडगे, राजू रजपुते, आदी उपस्थित होते. आघाडीच्यावतीने ‘शविआ’चे सर्वेसर्वा आमदार हाळवणकर यांच्याबरोबर मोरबाळे व शेळके यांनी चर्चा करावी. आघाडीचे चिन्ह कोणते असावे, त्याचबरोबर मॅँचेस्टर आघाडीसाठी किमान १२-१३ उमेदवार सोडावेत, असेही ठरले. बोलणी फिस्कटल्यास पुढील आठवड्यात स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असा निर्णय घेतल्याचे आघाडीचे अध्यक्ष चाळके यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीतील कारंडे गटानेसुद्धा पुढील आठवड्यामध्ये बैठक घेऊन निवडणुकीची दिशा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मात्र प्रमुख पक्ष राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील जांभळे गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या पातळीवर शांतता आहे. (प्रतिनिधी)