इचलकरंजी : मुख्याधिकारी-नगरसेवकात वादावादी : इचलकरंजीत तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:35 PM2018-09-15T23:35:43+5:302018-09-15T23:44:23+5:30

येथील शहापूर खणीतील जलपर्णी निर्मूलन करण्याच्या कामात मक्तेदाराकडून अत्यंत तोकडी यंत्रणा लावली आहे, तर त्या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणा काम करीत असल्याचा जाब

Ichalkaranji: Controversy in the Chief-Officer-Corporator: Ichalkaranjeet Tension Environment | इचलकरंजी : मुख्याधिकारी-नगरसेवकात वादावादी : इचलकरंजीत तणावाचे वातावरण

इचलकरंजी : मुख्याधिकारी-नगरसेवकात वादावादी : इचलकरंजीत तणावाचे वातावरण

Next
ठळक मुद्देजलपर्णी हटविण्यासाठी पालिकेची यंत्रणा लावल्याबद्दल विचारला जाब

इचलकरंजी : येथील शहापूर खणीतील जलपर्णी निर्मूलन करण्याच्या कामात मक्तेदाराकडून अत्यंत तोकडी यंत्रणा लावली आहे, तर त्या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणा काम करीत असल्याचा जाब शनिवारी कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी विचारल्यावरून मुख्याधिकारी दीपक पाटील व बावचकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी काही नगरसेवक, नागरिकांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

शहापूर खणीमध्ये घरगुती व सार्वजनिक असे सुमारे तेरा हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होते. यंदा खणीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णीचा प्रादुर्भाव होऊन पूर्ण जलपर्णीने व्यापली. त्यामुळे खणीतील जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी शहापूर परिसरातील नगरसेवक प्रयत्न करीत होते. खणीमधील जलपर्णी निर्मूलनासाठी नगरपालिकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्याप्रमाणे मक्तेदार वाझे यांची सुमारे दहा लाख रुपयांची निविदा स्वीकारण्यात आली.

गेल्या पाच दिवसांपासून मक्तेदार खणीतील जलपर्णी उचलून बाहेर टाकण्याचे काम करीत होते. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या तुटपुंज्या यंत्रणेमुळे जलपर्णी हटविण्याचे कार्य वेगाने होत नव्हते. घरगुती गणपतींचे विसर्जन उद्या, सोमवारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगरसेवक बावचकर, राजर्षी शाहू आघाडीचे प्रमुख मदन कारंडे, गटनेते उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, प्रधान माळी, दादा भाटले, आदींनी शनिवारी सकाळी खणीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

नगरसेवक व त्या परिसरातील काही नागरिक खणीवर गेले. त्यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी पाटील हे खणीवरील सुरू असलेल्या जलपर्णी निर्मूलन कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत होते. खणीतील जलपर्णी हटविण्याचे काम नगरपालिकेकडील आरोग्य खात्याचे काही कर्मचारी करीत असल्याची बाब नगरसेवकांच्या लक्षात आली.

तेव्हा नगरसेवक बावचकर यांनी जलपर्णी हटविण्याचे काम नगरपालिकेच्या कर्मचारी व यंत्रणेकडून होत आहे. मग, दहा लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करून पैशाची उधळपट्टी का होत आहे, असा प्रश्न मुख्याधिकारी पाटील यांना विचारला. तेव्हा जलपर्णी निर्मूलनासाठी वेग यावा, म्हणून पालिकेची यंत्रणा काम करीत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. पण, मुख्याधिकाऱ्यांच्या खुलाशाने समाधान न झालेल्या बावचकर यांनी नगरपालिकेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप केला असता मुख्याधिकारी पाटील भडकले आणि बावचकर व मुख्याधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोघेही मोठमोठ्याने बोलत असल्याने तेथे तणाव निर्माण झाला. मात्र, अल्प काळातच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी केली आणि बावचकर व पाटील यांच्यातील झालेल्या वादावर पडदा पडला.

असा प्रकार घडत असताना याबाबतची माहिती उपस्थितांकडून शहापूर पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे शहापूर पोलीस घटनास्थळी आले. मात्र, एव्हाना शांतता पसरली होती.दरम्यान, मक्तेदाराकडून खणीपासून जवळच असलेल्या रिकाम्या जागेत जलपर्णी टाकली जात होती. आसपासच्या वसाहतीत दुर्गंधी, डास, तसेच जलचरांचा प्रादुर्भाव होत असल्याबद्दल महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी खणीतून काढलेली जलपर्णी आसरानगरजवळील कचरा डेपोमध्ये टाकण्याचे आदेश दिले.


इचलकरंजी येथे शहापूर खणीतील जलपर्णी निर्मूलनावरून पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील व नगरसेवक शशांक बावचकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी नितीन कोकणे, मदन कारंडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Ichalkaranji: Controversy in the Chief-Officer-Corporator: Ichalkaranjeet Tension Environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.