इचलकरंजीत यंत्रमागधारकांचे धरणे

By admin | Published: July 28, 2016 12:31 AM2016-07-28T00:31:05+5:302016-07-28T00:52:26+5:30

उत्स्फूर्त प्रतिसाद : वस्त्रोद्योगातील मंदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू

Ichalkaranji detonators | इचलकरंजीत यंत्रमागधारकांचे धरणे

इचलकरंजीत यंत्रमागधारकांचे धरणे

Next

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील मंदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात बुधवारपासून यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह कारखानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला.
गेल्या वर्षापासून वस्त्रोद्योगाला मंदीचे ग्रहण लागले आहे. वीज आणि सूत दरातील सततची वाढ, तसेच कापडाला योग्य प्रमाणात नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक नुकसान सोसून व्यवसाय चालवित आहे. यंत्रमाग व्यवसायाला शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीत घट झाल्याने यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. शहरातील बहुतांश यंत्रमागधारक आपले कारखाने आठवड्यातून काही वेळा बंद ठेवत आहेत. दरम्यान, हत्ती चौक परिसरातील यंत्रमागधारकाने कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, गणेश शहाणे, सचिन भुते व फारुक शिरगावे यांनी बुधवारपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाच दिवस हे आंदोलन सुरू राहणार असून, यातूनही शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष महावीर जैन, सागर चाळके, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, सदा मलाबादे, नरसिंह पारीक, संघटनेचे विश्वनाथ मेटे, विनय महाजन, नारायण दुरुगडे, प्रदीप धुत्रे यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि कारखानदारांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)


शासनाने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणावी
इचलकरंजी : राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणारा वस्त्रोद्योग मंदीच्या भयावह परिस्थितीतून जात आहे. त्याला सावरण्यासाठी राज्य शासनाने या उद्योगाकडे ताबडतोब लक्ष द्यावे. योग्य ती उपाययोजना करून या उद्योगाला ऊर्जितावस्था आणावी. जेणेकरून यंत्रमाग कारखानदारांबरोबर कामगारांचेसुद्धा जीवनमान उंचावेल, अशा आशयाचे पत्रक भारतीय कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सचिन खोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
वस्त्रोद्योग मोडकळीस आल्यामुळे अनेक यंत्रमाग कारखानदार कर्जबाजारी झाले आहेत. अशा या यंत्रमागाची चाके मंदावली, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठोपाठ यंत्रमागधारक व कामगार आत्महत्येस प्रवृत्त होतील. त्यामुळे विजेच्या दराची सवलत, वाढत जाणाऱ्या सुताचे भाव नियंत्रणात आणणे, तसेच कापड उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी खेळत्या भांडवलावर अनुदान, अशा सवलती शासनाने ताबडतोब लागू कराव्यात, असेही या पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ichalkaranji detonators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.