इचलकरंजी : दुकानं बंद करण्यास सांगितल्यानं व्यापारी, नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 05:03 PM2021-06-28T17:03:55+5:302021-06-28T17:04:21+5:30
Coronavirus : नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दुकानं बंद ठेवण्यास सांगितलं. वादामुळे काही काळ तणावाचं वातावरण.
इचलकरंजी : शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी शटर उघडून दुकान सुरू केले. त्याला नगरपालिकेने विरोध करून बंद ठेवण्यास सांगितल्याने व्यापारी व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक व्यवसाय वगळता अन्य सर्व व्यवसाय, दुकाने गेल्या ८० दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्ह्यामध्ये दुकाने उघडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यापार व दुकानदारांनी केला होता. त्यानुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकाने उघडली असता नगरपालिकेच्या पथकाने शटर बंद करण्यास सांगितले. त्यामुळे व्यवसायिक व नगरपालिका कर्मचारी यांच्यात वादावादीचे प्रसंग घडला.
बंदला विरोध करत अनेक दुकानदारांनी गळ्यात फलक घातले होते. त्यावर 'नही जयेंगे काम को तो क्या खायेंगे शाम को, लॉकडाऊन हटवा व्यापाऱ्यांना वाचवा' असे फलक लावून व्यवसायिक रस्त्यावर उभे होते.