इचलकरंजीत कर्फ्यूतून सूट दिल्याने खरेदीसाठी पुन्हा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:52+5:302021-05-14T04:22:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. सणाच्या खरेदीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. सणाच्या खरेदीसाठी दोन दिवस सूट दिल्यामुळे पहाटेपासूनच बाजारपेठत झुंबड उडाली होती. वारंवार प्रशासन आवाहन करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत खरेदी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र शहर व परिसरात दिसून येत होते.
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर सनियंत्रण समितीने ११ ते १६ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला होता. मात्र, यामध्ये बदल करत सणाच्या खरेदीचे कारण पुढे करत १३ व १४ मे या दोन दिवसांसाठी सूट देण्यात आली. त्यामुळे गुरुवारी नागरिकांनी पुन्हा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. प्रशासनाचा ढिसाळ कारभार व नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे दिवसेंदिवस गर्दीचा उच्चांक होत आहे.
सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खरेदीसाठी मुभा देण्यात आल्यामुळे दिवसभराची खरेदी काही तासात उरकून घेण्यासाठी बाजारात झुंबड उडाली होती. अशा प्रकारामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे सध्यातरी अशक्य असल्याचे काही जाणकारांतून बोलले जात आहे. खरेदी करून नागरिकांनी दुपारनंतर घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे सकाळी गर्दीने वाहणारे रस्ते दुपारनंतर निर्मनुष्य दिसत होते. अकरानंतर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला.
चौकट
अनेक आस्थापने सुरूच
प्रशासनाने केवळ अत्यावश्यक आस्थापनांना जनता कर्फ्यूतून सूट दिली होती. सणामुळे केवळ किराणा व मसाले या आवश्यक आस्थापनांना दोन दिवस सूट दिली आहे. याचा फायदा घेत अनेक आस्थापने सुरू ठेवण्यात आली असल्याचे बाजारपेठेत दिसत होते.
फोटो ओळी
१३०५२०२१-आयसीएच-०१
१३०५२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत कर्फ्यूतून सूट दिल्याने खरेदीसाठी नागरिकांनी अशी गर्दी केली होती.