इचलकरंजी : आठ बँकांचे अस्तित्व संपुष्टात

By Admin | Published: September 25, 2014 12:08 AM2014-09-25T00:08:49+5:302014-09-25T00:30:43+5:30

ठेवीदारांचा जीव टांगणीला : सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे भांडवल बुडाले

Ichalkaranji: The existence of eight banks ended | इचलकरंजी : आठ बँकांचे अस्तित्व संपुष्टात

इचलकरंजी : आठ बँकांचे अस्तित्व संपुष्टात

googlenewsNext

इचलकरंजी : आर्थिक शिस्त बिघडल्याने आणि काही मुजोर कर्जदारांनी अर्थसाहायाची परतफेड करण्यास हयगय केल्यामुळेच आठ सहकारी बॅँका लयाला गेल्या आहेत. सध्या चौंडेश्वरी सहकारी बॅँकेला रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक निर्बंध लावल्याने सहकारी बॅँकांचा विषय ऐरणीवर आला आहे.
वास्तविक पाहता इचलकरंजीला संस्थानकाळापासून सहकार चळवळीची परंपरा आहे. येथील सेंट्रल को-आॅप. बॅँक, विविध कार्यकारी सोसायटी या संस्थांना तब्बल शंभर वर्षांचा इतिहास आहे. सेंट्रल बॅँकेचे पुढे इचलकरंजी अर्बन को-आॅप. बॅँकेत रूपांतर झाले. वस्त्रनगरीच्या वाढत जाणाऱ्या उद्योग-धंद्याबरोबर आर्थिक चणचण भासू लागली. म्हणून तत्कालीन नेतृत्वाने इचलकरंजी जनता सहकारी बॅँक, पीपल्स को-आॅप. बॅँक अशा बॅँकांची स्थापना केली. ज्यांच्या अर्थसाहाय्यावर इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाची भरभराट झाली.
वाढत जाणाऱ्या वस्त्रोद्योगाच्या व्यापाराबरोबर शिवनेरी बॅँक, नूतन नागरी सहकारी बॅँक, कामगार बॅँक, चौंडेश्वरी बॅँक, इचलकरंजी महिला सहकारी बॅँक अशा बॅँकांची स्थापना झाली. पुढे सन १९९० नंतर वस्त्रनगरीच्या विकासाबरोबर सहकार क्षेत्रात नवीन दहा-बारा बॅँकांची भर पडली. अलीकडील दहा-पंधरा वर्षांत या बॅँकांमधील आर्थिक शिस्तीला ग्रहण लागले. काही बड्या कर्जदारांनी कर्जाचे हप्ते थकविले. बॅँकांना न्यायालयाच्या फेऱ्यात अडविले. काही घोटाळेही झाले. पीपल्स बॅँकेचे तत्कालीन व्यवस्थापक बी. एम. दानोळे यांनी एका बोगस वस्त्रोद्योग संस्थेच्या नावे चार लाख ९५ हजार रुपयांचे कोणतेही तारण नसताना कर्ज उचलले. त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. या प्रकरणी १५ सप्टेंबरला न्यायालयाने दानोळे यांना तीन वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
अशा प्रकारे शहरातील दोन बॅँका अन्य बॅँकांमध्ये विलीन झाल्या, तर सात बॅँका अवसायानात गेल्याने त्यांचे नामोनिशाण नष्ट झाले. बॅँकांकडे असणारे हजारो सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल बुडाले, तर कोट्यवधी रुपये ठेवीमध्ये गुंतवणाऱ्या हजारो ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला.
याचदरम्यान आर्थिक शिस्त पाळणाऱ्या आणि अटी-नियमांचे पालन करणाऱ्या काही बॅँकांनी मात्र नेत्रदीपक प्रगती साधलीय. सहकार क्षेत्रात लौकिक वाढत बहुराज्य कामगिरी बॅँका करीत आहेत. चौंडेश्वरी बॅँकेवर १ सप्टेंबरपासून रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक निर्बंध लावले आहेत. तीन आठवडे उलटले तरी बॅँकेच्या व्यवस्थापन मंडळाने बॅँक वाचविण्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याने हजारो ठेवीदार, खातेदार व सभासदांचा जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)
दोन विलीन, तर सात अवसायानात
शहरातील शिवनेरी बॅँकेचे विलीनीकरण डोंबिवली बॅँकेत, महिला बॅँकेचे विलीनीकरण पारसीक बॅँकेत झाले; तर पीपल्स, कामगार, जिव्हेश्वर, लक्ष्मी-विष्णू, साधना, अर्बन या बॅँका अवसायानात निघाल्या. आता चौंडेश्वरी बॅँकेवरही आर्थिक निर्बंध आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Ichalkaranji: The existence of eight banks ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.