इचलकरंजीतील टोळ्या ‘मोका’टच!

By Admin | Published: July 25, 2016 12:57 AM2016-07-25T00:57:07+5:302016-07-25T00:57:07+5:30

शहरात दहशत : माळी टोळीप्रमाणे मुसक्या आवळण्याची गरज

Ichalkaranji groups 'Moka'! | इचलकरंजीतील टोळ्या ‘मोका’टच!

इचलकरंजीतील टोळ्या ‘मोका’टच!

googlenewsNext

अतुल आंबी ल्ल इचलकरंजी
शहापूर, तारदाळ व खोतवाडी या ग्रामीण परिसरासह औद्योगिक वसाहतीत खंडणी, खून, अपहरण यासह गंभीर गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या अमोल माळीच्या टोळीवर इचलकरंजी पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. या कारवाईचे नागरिकांतून स्वागतच होत आहे. मात्र, शहरातील अवैध व्यवसायाच्या माध्यमातून आपली दहशत पसरविणाऱ्या टोळ्या अद्याप मोकाटच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमोल माळी याच्यासह आठजणांच्या टोळीवर शहापूर पोलिसांनी मोका (संघटित गुन्हेगारी) कायद्यांतर्गत कारवाई केली. गंभीर दहा गुन्ह्यांत सहभाग असल्याने मोकाअंतर्गत कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले. मात्र, अन्य गुन्हेगारांची परिस्थिती वेगळीच आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनीच कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक मोठ्या गुन्हेगारांनी प्रत्येक गुन्ह्यावेळी सहकारी बदलले आहेत. तर गंभीर गुन्ह्यांमध्ये काही वर्षांचे अंतर टाकले आहे. त्यामुळे असे गुन्हेगार मोका कायद्याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात.
वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात देशातील अनेक राज्यांतून नागरिक याठिकाणी व्यवसायासाठी येऊन रहिवाशी झाले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांबरोबर अशा काही प्रवृत्तीही शहरात आल्या. त्यांनी स्थानिक गुंडांबरोबर हातमिळवणी करून आपले साम्राज्य निर्माण केले. अवैध व्यवसाय, त्यातून मिळणारा पैसा या माध्यमातून तरुणांना भुरळ घालून आपल्या जाळ्यात ओढले. कमी श्रमातून मिळणारा अधिक पैसा, भुरटा रूबाब या भूलभुलय्यात अडकून असे तरुण काहीही करायला तयार असतात. कायद्याचा व पोलिसांचा धाक कमी झाल्यानेच अशी गुन्हेगारी फोफावते. चिल्लर फाळकूटदादाही एखाद्या पोलिसाबरोबर सलगी करून रूबाबात फिरतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
सरकार बदलते, मंत्री बदलतात, पोलिस अधिकारीही बदलतात. मात्र, शहरातील गुंड, गुन्हेगार तसेच राहतात. या गुन्हेगारांना गजाआड करून सर्वसामान्य जनतेला कोणाकडून न्याय मिळणार का? वर्षानुवर्षे आपले साम्राज्य प्रस्थापित करून उजळ माथ्याने मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न जनतेतून व्यक्त होत आहे.
‘मोका’ कायद्यातील तरतूद
‘मोका’ कायद्याच्या तरतुदीनुसार दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन सलग तीन वर्षांच्या कालावधीत पैसे मिळविण्याच्या उद्देशाने केलेले गंभीर गुन्हे दाखल झाल्यास मोका अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे शहरातील काही नामी गुन्हेगार याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात.
अनेक गुन्हेगारांना नगरसेवकपदाची स्वप्ने
४इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने अनेक गुन्हेगारी जगतातील गुंडांना नगरसेवक बनण्याची स्वप्ने पडत आहेत. त्या पद्धतीने भागात ‘फिल्डिंग’ लावण्याचे कामही काहीजणांनी सुरू केले आहे.
४अवैध मार्गाने पैसे कमवायचे आणि राजकारणात येऊन ‘व्हाईट कॉलर’ बनून आपली प्रतिमा उजळ करण्याचा हा प्रयत्न आहे. यांना जनतेशिवाय आता रोखणार तरी कोण? शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रवृत्तींना मते देऊन नेता बनवू नका, असा संदेश देण्यास सुरुवात केली आहे. जनतेने डोळसपणे मतदान केल्यास अशा प्रवृत्ती ठेचल्या जातील.

Web Title: Ichalkaranji groups 'Moka'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.