इचलकरंजीत अमली पदार्थांचे जाळे विस्तारतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2015 12:52 AM2015-06-26T00:52:26+5:302015-06-26T00:52:26+5:30

पोलिसांना आव्हान : युवकांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

Ichalkaranji has expanded the network of substances | इचलकरंजीत अमली पदार्थांचे जाळे विस्तारतेय

इचलकरंजीत अमली पदार्थांचे जाळे विस्तारतेय

Next

घन:शाम कुंभार -यड्राव -इचलकरंजीमध्ये पसरत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यापाराने जयसिंगपूर परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कवेत घेतले आहे. यामुळे इचलकरंजी व जयसिंगपूर परिसरातील शेकडो विद्यार्थी व्यसनी बनत आहेत. त्यास वेळीच पायबंद घातला तर युवा पिढी व्यसनांपासून दूर राहील. यासाठी अमली पदार्थ तस्करी शोधून काढणे पोलिसांना आव्हान बनले आहे.
पोलिसांनी योग्य कारवाई केली तर अमली पदार्थ सेवन विरोधी दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. येथील महाविद्यालयीन युवकांना हेरून त्यांच्याकडून अमली पदार्थांची तस्करी सुरू आहे. इचलकरंजी येथे माल पोहोचल्यावर त्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह इतर युवा वर्ग ग्राहक मिळवून दिल्याने संबंधित युवकांना चांगला मोबदला मिळत आहे.
अशा पद्धतीने इचलकरंजी परिसरातील महाविद्यालयीन युवकांत अमली पदार्थ सेवनाचे व्यसन पसरत आहे. येथे बाहेरून शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी प्रामुख्याने अशा प्रकारास बळी पडत आहेत. इचलकरंजी परिसरात स्थिरावलेल्या या अवैध व्यवसायाने जयसिंगपूर येथील महाविद्यालयीन युवकांना कवेत घेऊन येथूनच विस्ताराचे केंद्र बनत आहे.
या वितरण व्यवस्थेतील युवकांची माहिती इचलकरंजीतील पोलिसांना आहे, परंतु मुद्देमालासह पकडण्यासाठी पोलीस योग्य वेळेची वाट पाहत आहेत. या सर्वच गोष्टीमुळे जयसिंगपूर येथील परिसर या व्यवस्थेला सोयीचा ठरत आहे. जयसिंगपूर हे इचलकरंजी, सांगली, मिरज, चिक्कोडी व इतर कर्नाटक भागासाठी केंद्र ठरत असल्याने या व्यापारास सोईचे ठरत आहे.
या अवैध धंद्यातील युवकांकडून इतर अनेक गुन्हे घडवून आणले जात आहेत. युवकांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. अशा प्रकारात असलेले विद्यार्थी खोट्या अमिषापोटी कोणत्याही थराला जाऊन गुन्हा घडू शकतो.
एखादी घटना घडल्यानंतर विचार किंवा उपाययोजना करण्यापेक्षा ती घटना घडू नये यासाठी दक्षता घेणे व युवकांना या गुन्हेगारी पाशातून बाहेर काढणे हे पोलिसांपुढे आव्हान आहे. घटना घडण्यापूर्वी त्याचा सुगावा लावणे पोलिसांना क्रमप्राप्त बनले आहे, अन्यथा अमली पदार्थांचा विस्तार वाढेल आणि युवकांच्या भवितव्यापुढे प्रश्न उभा राहील.

‘नेत्र’ उघडे असूनही कारवाई नाही
आठ दिवसांपूर्वी अमली पदार्थ तस्करांनी सांगली नाका परिसरातील बार बंद झाल्यावर जबरदस्तीने उघडून मद्यप्राशन केले. बिलासाठी वाद झाल्याने वेटरला मारहाण व साहित्याची मोडतोड केली व ते निघून गेले. हे सर्व ‘नेत्र’ उघडे ठेवून बारवाले पाहत होते. असे प्रकार वारंवार घडूनही व पोलिसांना याची कल्पना असूनही याबाबत तक्रार नसल्याने पोलिसांकडून कारवाई झाली नाही.

Web Title: Ichalkaranji has expanded the network of substances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.