इचलकरंजीला शासकीय यंत्रणेचे सहकार्य नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:23+5:302021-05-27T04:25:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पासाठी ५० लाख आणि लहान मुलांचा १० बेडचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पासाठी ५० लाख आणि लहान मुलांचा १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी २० लाख असे ७० लाख रुपये स्थानिक विकास निधीतून दिले असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. तसेच रुग्णालयात २० व्हेंटिलेटर असले तरी प्रत्यक्षात तीन सुरू असून, १७ बंद आहेत, असा गंभीर आरोप करून शासकीय आरोग्य यंत्रणेकडून इचलकरंजी शहर परिसरासाठी सहकार्य मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहर परिसरात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील मृत्युदरही सर्वाधिक आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आयजीएम रुग्णालयात आवश्यक मशिनरी व कर्मचारी नाहीत. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही आवश्यक मदत मिळत नाही, हे दुर्दैवी आहे. याबाबत आवाज उठविल्याास ते चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला जातो. ऑक्सिजनचे २०० बेड असून, त्यासाठी केवळ सहा हजार लिटर क्षमतेचा एक टॅँक आहे. दुसरा उभारण्याची घोषणा झाली; पण अंमलबजावणी झाली नाही. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर असून, त्याला गती नाही. अशा विविध समस्या असून, त्यँवर ताबडतोब मार्ग काढण्यासाठी म्हणून विधिमंडळ सदस्यांना आर्थिक वर्षात खर्चासाठी दिलेल्या एक कोटी रुपयांमधील ५० लाख रुपये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व २० लाख रुपये लहान मुलांच्या अतिदक्षता विभागासाठी दिले आहेत. उर्वरित ३० लाख रुपयांचा निधी ग्रामीण भागासाठी वापरला जाणार आहे.