इचलकरंजीत पक्षप्रमुखांच्या
By admin | Published: November 2, 2016 12:42 AM2016-11-02T00:42:32+5:302016-11-02T00:42:32+5:30
भाजप विरुद्ध काँग्रेस लढत : ४० टक्के विद्यमानांना वगळले
राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी
नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चाललेली खलबत्ते आणि नाराजीतून बंडखोरी होऊ नये म्हणून घेण्यात येणारी दक्षता, अशी तारेवरची कसरत शहरातील सर्व पक्ष व आघाड्यांच्या प्रमुखांना करावी लागली. या निवडणुकीत विद्यमान सभागृहाचे ४० टक्के नगरसेवक वगळले गेले. भाजप विरुद्ध कॉँग्रेस अशीच पक्षनेतृत्वाची कसोटी घेणारी ही निवडणूक आहे.
पालिका निवडणुकीमध्ये प्रथमच भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर नगरसेवकच्या काही जागा व नगराध्यक्षपद लढविले जाणार असल्यामुळे यापूर्वीचे नगरपालिका निवडणुकीतील संकेत बदलले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील कारंडे गटाची गोची झाल्यामुळे त्यांनी कॉँग्रेससोबत राहण्याचे पसंत केले; मात्र पक्षांतर्गत जांभळे गटाशी असलेले त्यांचे शत्रुत्व यावेळी उफाळून आले. म्हणून कारंडे गटाला शाहू आघाडी अशी स्वतंत्र गटाची स्थापना करावी लागली. याचा परिणाम म्हणून कॉँग्रेस, जांभळे व कारंडे गटामध्ये जागा वाटपावरून खलबत्ते झाली. यातून कॉँग्रेसने ३९ जागी आपले उमेदवार उभे केले. तर जांभळे गटाला आठ आणि कारंडे गटाला पंधरा जागा मिळाल्या.
आमदार सुरेश हाळवणकर यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजप ३१ व शहर विकास आघाडी ३१ अशा जागा लढविल्या जातील, असे घोषित केले होते. पुढे मात्र शहर विकास आघाडी आणि मॅँचेस्टर आघाडी असा समझोता झाला आणि निवडणूक चिन्हाची अडचण असल्यामुळे या दोन्ही आघाड्यांनी ताराराणी आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढविण्याचे ठरले. त्यांच्यामध्येसुद्धा भाजप ३९ व ताराराणी आघाडी २३ असे जागा वाटप झाले.
इचलकरंजीतील नगराध्यक्षपदासाठी २ लाख १५ हजार इतके मतदार असल्यामुळे ही निवडणूक एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीसारखी लढली जाणार, असा राजकीय व्होरा आहे. अशा स्थितीत नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार आणि त्याच्याविरुद्ध कॉँग्रेसचा उमेदवार असे सूत्र स्वीकारण्यात आल्यामुळे ही निवडणूक भाजपविरुद्ध कॉँग्रेस अशी होणार, असे निश्चित झाले होते. त्यामुळे पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीकडे पुढील विधानसभेची रंगीत तालीम असेच पाहिले जात आहे. अशा स्थितीत मात्र दोन्ही बाजूंकडून उमेदवारांची ‘इलेक्शन मेरीट’वर छाननी करताना सध्याच्या सुमारे ४० टक्के नगरसेवकांना वगळले आहे.
वगळण्यात आलेले नगरसेवक
वगळण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये रत्नमाला भागवत, पारुबाई चव्हाण, हेमलता आरगे, भक्ती बोंगार्डे, मीना बेडगे, सुजाता बोंगाळे, रेखा रजपुते, प्रमिला जावळे, आक्काताई आवळे, सुमन पोवार, सुप्रिया गोंदकर, आक्काताई कोटगी, छाया पाटील, बिस्मिल्ला मुजावर या नगरसेविकांचा, तर बाळासाहेब कलागते, भीमराव अतिग्रे, संभाजीराव काटकर, शशांक बावचकर, मदन झोरे, महेश ठोके, रवींद्र माने, रणजित जाधव, चंद्रकांत शेळके, अजित जाधव या नगरसेवकांचा समावेश आहे. काही नगरसेवकांच्या नातेवाइकांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.