इचलकरंजीतील घरफोड्यांचा तपास होणार कधी ?
By admin | Published: November 7, 2014 09:14 PM2014-11-07T21:14:06+5:302014-11-07T23:41:01+5:30
यंत्रणा सुस्त : सामान्यांवर अन्याय नित्याचाच; वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार काय ?
अतुल आंबी - इचलकरंजी --चोरट्यांनी धुमाकूळ घालत शहरातील लंगोटे मळा, आमराई रोड, ज्ञानेश्वर कॉलनी या परिसरातील सहा घरे फोडून लाखो रुपयांची चोरी केली. या प्रकरणाला चार दिवस उलटले तरी पोलीस यंत्रणा सुस्तच आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचीही स्थापना करण्यात आली. मात्र, ‘कलेक्शन’मधील वाटणी व्यतिरिक्त याचा कोणताच फायदा सामान्य नागरिकांना होताना दिसत नाही.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वचक कमी असल्यामुळे पोलिसांची ही यंत्रणा सुस्तावली आहे. चोरीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांची कच्ची नोंद घेतली जाते. त्यानंतर एखाद्या वशिला असलेल्या व्यक्तीच्या चोरी प्रकरणाच्या तपासात चोरटा सापडला तर त्याच्याकडे तपास करून त्यामध्ये सामान्य माणसाच्या घरी झालेली चोरी उघडकीस आली तर त्याची पक्की नोंद दाखवून चोर सापडल्याचे दाखवले जाते. त्यानंतर मात्र या सामान्य नागरिकाला आपला चोरीस गेलेला मुद्देमाल सोडवून घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया राबवावी लागते. यामध्ये पोलिसांचा जबाबही महत्त्वाचा. त्यामुळे त्यांच्याबरोबरही तडजोड करावी लागते.
पाच दिवसांपूर्वी लंगोटे मळा परिसरात दोन घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा चोरट्यांनी आमराई रोड व ज्ञानेश्वर कॉलनी येथील चार घरे फोडून तेथूनही लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सुरू असलेल्या या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.
एखाद्या सधन कुटुंबात झाली, तर पोलीस जी तत्परता तपासात दाखवितात, ती सामान्य नागरिकांच्या घरात चोरी झाल्यानंतर का दाखवित नाहीत, असा सवाल या परिसरातील नागरिक करीत होते.
किरकोळ कारणावरून झालेली भांडणेही पोलीस आपापसात तडजोडीने मिटविण्यावर भर देतात. यावेळीही ‘तुमचे मिटले, आमचे काय’ असे म्हणत दोन्ही पार्टींना आम्ही तुमच्या बाजूनेच होतो, असे म्हणत ‘भेटले’ जाते. शेतजमीन वाटणीच्या वादावादीप्रकरणी एका पार्टीकडून पोलिसांनी ‘अर्थ’ साधला की दुसऱ्या पार्टीला समजावून सांगितले जाते.
प्रामाणिक पोलिसांवर अन्याय का ?
पोलिसांच्या वरदहस्ताने काही अवैध व्यावसायिक आपला धंदा जोमाने करताना दिसतात. गेल्या सहा महिन्यांत अपहरण, गुटखा कारखाना, क्लब, लॉजवरील धाडी अशा प्रकरणांत अनेक पोलिसांची नावे चर्चेत आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र, याबाबत अद्याप चकार शब्दही काढला नाही. पोलिसांत भरती झाल्यापासून आजपर्यंतची या काही पोलिसांची मालमत्ता तपासली, तर ते कोट्यधीश असल्याचे सहजपणे लक्षात येईल. याउलट प्रामाणिक काम करणाऱ्या पोलिसांना मात्र परिवारासह घर खर्च चालवेपर्यंत मुश्किल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर अन्यायच झाल्याचे दिसते
चार पोलिसांच्या चौकडीचा धुमाकूळ
येथील एका पोलीस ठाण्यात चार पोलिसांच्या या चौकडीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अलिशान मोटारीतून फिरत ‘कलेक्शन’ करण्यात हेच यांचे प्रमुख काम. वरिष्ठांची मर्जी सांभाळणाऱ्या पोलिसांना काम करावे लागत नाही.
त्यांची कामे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांना वाढवून दिली जातात. त्यामुळे त्यांच्यावर ताण येऊन त्यांना मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. या यंत्रणेत सुधारणा होणार का, असाही प्रश्न काम करणाऱ्या पोलिसांसह कुटुंबीयांना पडला आहे.