पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने आराखडा करावा; पालकमंत्री सतेज पाटील :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:22+5:302021-01-02T04:21:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. त्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी खर्च ...

Ichalkaranji Municipal Council should make a plan to prevent pollution of Panchganga; Guardian Minister Satej Patil: | पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने आराखडा करावा; पालकमंत्री सतेज पाटील :

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने आराखडा करावा; पालकमंत्री सतेज पाटील :

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. त्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषणाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, उदय गायकवाड उपस्थित होते.

पाटील म्हणाले, महापालिकेच्या ९६ एमएलडी पाण्यापैकी ९१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून पंचगंगेत सोडले जाते. त्याच पध्दतीने नदीकाठावरील ग्रामपंचायती आणि इचलकरंजीमधील औद्योगिक कारखाने यांनीही सांडपाण्यावर प्रकिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यावर कालबध्द कार्यक्रम करावा. इचलकरंजीमध्ये डाईंग युनिट घरोघरी आहेत. यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर काय प्रक्रिया करता येईल, क्लस्टर पध्दतीने हे पाणी साठवून उचलता येईल का, याबाबतचा आराखडा नगरपालिकेने तयार करावा. ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मिळालेला यावर्षीचा निधी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरच खर्च करावा. उचगाव, गांधीनगर, तळंदगे, पाचगाव या गावांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रकल्प करावा. त्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले आहेत. महिन्याभरात डीपीआरचे काम पूर्ण करावे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांना नोटीस पाठवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तपासणीच्या तसेच झेडएलडी करण्याबाबत वीज वापर तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, प्रशासन अधिकारी दीपक पाटील, इचलकरंजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे आदी उपस्थित होते.

---

दूध पिशव्यांबाबत इको सिस्टिमसाठी नियोजन करा

घरोघरी प्लास्टिक पिशव्यांमधून दूध पोहोचवले जाते. या पिशव्यांबाबत इको सिस्टिम काय करता येईल, याबाबत दूध उत्पादक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांच्याकडून नियोजन आराखडा घ्यावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. तसेच ‘आय इट प्लास्टिक’ असे घोषवाक्य घेऊन महापालिकेने नावीन्यपूर्णमधून पथदर्शी प्रकल्प राबवावा, तसा प्रस्ताव पाठवा, अशी सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.

--

फोटो नं ०१०१२०२१-कोल-पंचगंगा बैठक

ओळ : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पंचगंगा प्रदूषणाबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, उदय गायकवाड उपस्थित होते.

--

Web Title: Ichalkaranji Municipal Council should make a plan to prevent pollution of Panchganga; Guardian Minister Satej Patil:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.