इचलकरंजीत आता ६२ नगरसेवक

By Admin | Published: October 9, 2015 11:19 PM2015-10-09T23:19:02+5:302015-10-09T23:19:02+5:30

आगामी निवडणुकीत अंमलबजावणी : प्रत्येक प्रभागात पाच हजार मतदार; नवीन मतदार नोंदणी सुरू

Ichalkaranji is now 62 corporators | इचलकरंजीत आता ६२ नगरसेवक

इचलकरंजीत आता ६२ नगरसेवक

googlenewsNext

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता सध्या असलेल्या ५७ प्रभागांची संख्या ६२ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. सन २०१६ मध्ये प्रभागनिहाय होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात ४७०० ते ५२०० मतदार संख्या राहणार आहे.नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदविण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून, मतदार नोंदविण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत असलेल्या ५७ प्रभागांपैकी २९ प्रभाग महिला राखीव होते. तर पाच प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित होते. त्यावेळी प्रभागनिहाय निवडणुका होण्याऐवजी चार नगरसेवकांचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणूक झाली होती. मात्र, आता पालिकेची आगामी निवडणूक प्रभागनिहाय एक नगरसेवक याप्रमाणे होणार आहे. आता पुढील वर्षी होणारी निवडणूक सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार होणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे सध्या दोन लाख ८७ हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे सध्याच्या ५७ प्रभागांमध्ये आणखीन पाच नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामध्ये ३२ प्रभाग महिलांसाठी राखीव असतील. तर सहा प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामध्ये तीन प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी राखीव राहतील. सध्या नवमतदार व स्थलांतरित मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नगरपालिकेच्यावतीने शहरात विविध अशा दहा ठिकाणी डिजिटल फलक उभारून नवमतदारांनी आपले मतदान संबंधित मतदान केंद्रावर नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सध्याच्या नगरसेवकांनी नागरिकांमध्ये जागृती आणून मतदान नोंदणीसाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदारांची नोंदणी ?
आगामी निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांनी आसपासच्या खेडेगावांतील त्यांच्या ओळखीचे उमेदवार इचलकरंजीत बोलविण्यास सुरूवात केली आहे. नवमतदार व स्थलांतरित मतदार अशा गोंडस नावाखाली नोंदविण्यात येणाऱ्या अशा मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे समजते. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये मातब्बर उमेदवार प्रतिस्पर्धी असतात. तेथे मतदारांचा भाव आपोआप वधारतो. जेवणावळी होतात. ओल्या पार्ट्यांबरोबर दक्षिणाही मिळते. महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांना बहार येते. अगदी मतदानाच्या दिवशी चांगला वजनदार ‘दर’ मिळतो. त्यामुळे एकाच पत्त्यावर गठ्ठा मतदानही नोंदविले जाते. याकडे मात्र पालिकेच्या प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी सूज्ञ नागरिकांची आहे.

Web Title: Ichalkaranji is now 62 corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.