इचलकरंजीत ‘रात्रीस खेळ चाले’: फॉर्च्युन मल्टिप्लेक्समध्ये मध्यरात्री लावला खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:16 AM2019-05-03T11:16:09+5:302019-05-03T11:18:07+5:30
मध्यरात्री एकनंतर चित्रपट दाखविण्यास बंदी असताना रविवारी (दि. २६)मध्यरात्री इचलकरंजीतील फॉर्च्युन मल्टिप्लेक्स ‘रात्रीस खेळ चालला’ याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, चित्रपटगृहमालक कनक ब्रजलाल शहा यांना अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : मध्यरात्री एकनंतर चित्रपट दाखविण्यास बंदी असताना रविवारी (दि. २६)मध्यरात्री इचलकरंजीतील फॉर्च्युन मल्टिप्लेक्स ‘रात्रीस खेळ चालला’ याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, चित्रपटगृहमालक कनक ब्रजलाल शहा यांना अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
इचलकरंजीतील ‘फॉर्च्युन मल्टिप्लेक्स’ या चित्रपटगृहात रविवारी (दि. २६) मध्यरात्री १.१५ वाजता ‘अवेंजर’ या चित्रपटाचा खेळ दाखविण्यात आला. याबाबत दुरध्वनीवरून जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीस अनुसरून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश इचलकरंजी करमणूक कर निरीक्षकांना देण्यात आले होते.
त्यानुसार सोमवारी (दि. २७) व मंगळवारी (दि. २८) मध्यरात्री चित्रपटाचा शो लावल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यामध्ये सोमवारी (दि. २७) व मंगळवारी (दि. २८) मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४ या वेळेत ‘अवेंजर’ या चित्रपटाचा खेळ प्रदर्शित करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच या खेळासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीही प्रसिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई चित्रपटगृह (विनियमन)अधिनियम १९५३ व महाराष्टÑ चित्रपटगृह (विनियमन) नियम १९६६ अन्वये नमुना (ई) व नमुना (फ) मध्ये चित्रपटगृहासाठीचा परवाना देण्यात येतो. या परवान्यामधील अटी व शर्तींचे पालन करणे हे संबंधित चित्रपटगृह मालकास बंधनकारक असते.
यातील अटीनुसार कोणताही चित्रपट हा मध्यरात्री एकनंतर प्रदर्शित करता येणार नाही; परंतु ‘फॉर्च्युन मल्टिप्लेक्स’ या चित्रपटगृहाचे मालक कनक शहा यांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे चौकशी अहवाल व उपरोक्त पुराव्यांमुळे समोर आले आहे; त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी सोमवारी (दि. २९) संबंधित मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी चित्रपटगृहाचा परवाना का रद्द करू नये, याबाबत लेखी म्हणणे स्वत: उपस्थित राहून सादर करावे.
याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला काहीच सांगायचे नाही, असे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे; त्यामुळे मालक काय खुलासा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.