इचलकरंजी पोलीस दलाला नवीन वाहनांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:40+5:302021-04-02T04:23:40+5:30
इचलकरंजी : शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांतील वाहने वारंवार बिघडतात. परिणामी महिन्यातून दोन-चारवेळा दुरुस्तीसाठी गॅरेज विभागाकडे जातात. त्यामुळे आरोपींना शोधण्यापासून ...
इचलकरंजी : शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांतील वाहने वारंवार बिघडतात. परिणामी महिन्यातून दोन-चारवेळा दुरुस्तीसाठी गॅरेज विभागाकडे जातात. त्यामुळे आरोपींना शोधण्यापासून ते अटक करून न्यायालयात नेण्यापर्यंत चक्क मोटरसायकल अथवा रिक्षाचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे इचलकरंजी पोलीस दलासाठी नवीन वाहने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दोन वाहने आहेत. त्यामधील एक वाहन पोलीस निरीक्षकास, तर दुसरे वाहन कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगसाठी देण्यात आले होते. त्यातील एक वाहन गावभाग पोलीस ठाण्याकडे तात्पुरते वापरासाठी दिले आहे. कारण तेथील मंजूर असलेले एकुलते एक वाहन सध्या दुरुस्तीसाठी गॅरेज विभागाकडे दिले आहे. तसेच शहापूर पोलीस ठाण्यास याआधी दोन वाहने देण्यात आली होती. त्यातील एक वाहन इस्पुर्ली (ता. करवीर) येथे देण्यात आले आहे. या तिन्ही पोलीस ठाण्यांतील वाहने महिन्यातून दोन-चार दिवस गॅरेज विभागाकडे दुरुस्तीसाठी दिली जातात. गेल्या दोन महिन्यांत विविध घटनांमधील संशयितांना रिक्षातून अथवा मोटरसायकलवरून न्यायालयात न्यावे लागले. काही वेळेला सहाआसनी वडापचाही सहारा घ्यावा लागला. एका प्रकरणात तर महात्मा गांधी पुतळा परिसरात वाहन बंद पडल्याने तेथून पुढे न्यायालयापर्यंत संशयितांना चालवत न्यावे लागले.
चौकट
किमान महत्त्वाच्या ठिकाणी नवीन वाहन आवश्यक
शहरातील गुन्हेगारीचे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण पाहता, मोठ्या पोलीस ठाण्यांना नवीन वाहनांसह अधिक संख्येने वाहने देणे आवश्यक आहे.
फोटो ओळी
०१०४२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत पंधरा दिवसांपूर्वी एका प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी सहाआसनी रिक्षातून न्यायालयात हजर केले होते.