इचलकरंजी पोलिसांना मिळणार नऊ अत्याधुनिक दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:07+5:302021-04-20T04:25:07+5:30
: शहरात १२८ ठिकाणी क्यूआर कोड प्रणाली़, घटनास्थळी अवघ्या काही वेळातच पोहोचणार पोलीस अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी ...
: शहरात १२८ ठिकाणी क्यूआर कोड प्रणाली़, घटनास्थळी अवघ्या काही वेळातच पोहोचणार पोलीस
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांची २४ तास गस्त वाढणार आहे. त्यासाठी इचलकरंजी पोलीस दलाला ई-बीट मार्शल सिस्टीमअंतर्गत ९ अत्याधुनिक दुचाकी मिळणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील १२८ ठिकाणी लावलेले क्यूआर कोड स्कॅन करीत गस्त घातली जाणार आहे. त्यामुळे घटनास्थळावर अवघ्या काही मिनिटांतच पोलीस पोहोचणार आहेत.
वस्त्रनगरीत देशभरातील अनेक राज्यांमधून नागरिक कामानिमित्त येऊन राहिले आहेत. औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंदे, कामगार संख्या वाढली, त्यापाठोपाठ गुन्हेगारीही फोफावली. त्यावर जरब बसविण्यासाठी आता पुण्यात राबविण्यात आलेली ई-बीट मार्शल सिस्टीम कोल्हापूर व इचलकरंजी शहरात राबविली जाणार आहे.
त्याअंतर्गत इचलकरंजीसाठी ९ अत्याधुनिक दुचाकी मिळणार आहेत.
या गाड्यांना सायरन वाजवणे, सूचना देणे (पुकारणे), फ्लॅश लाईट अशा आधुनिक सुविधा आहेत. त्यासाठी १८ दिवस व १८ रात्री असे ३६ पोलीस नियुक्त केले जातील. त्यांच्या माध्यमातून २४ तास संपूर्ण शहरात गस्त सुरू राहणार आहे.
गस्त सुरू असल्याची माहिती प्रत्येकवेळी पोलीस उपअधीक्षकांना मिळण्यासाठी शहरातील १२८ ठिकाणे निवडण्यात आली असून, त्या ठिकाणांवर क्यूआर कोड बसविण्यात आला आहे. प्रत्येक बीट मार्शलने नेमून दिलेल्या ठिकाणांवर जाऊन तो कोड स्कॅन करावयाचा आहे. तेथून कोणती दुचाकी कोठे आहे, यासंदर्भातील माहिती उपअधीक्षकांना मिळत राहणार आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास संबंधित बिट मार्शलला माहिती दिल्यानंतर काही मिनिटांतच ते घटनास्थळी पोहोचतील. या आधुनिक व्यवस्थेमुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविणे. त्याचबरोबर चेन स्नॅचिंग, वाटमारी, मारामारी अशा घटनांमध्ये तत्काळ हालचाली (अॅक्शन) मुळे फरक पडणार आहे.
चौकटी
क्यूआर कोडची विभागणी
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६०, गावभाग पोलीस ठाणे ३६, तर शहापूर पोलीस ठाणे ३२ अशा १२८ ठिकाणी क्यूआर कोड बसविण्यात येणार आहे.
चारचाकी वाहनांची मागणी
इचलकरंजी शहरासाठी किमान ९ चारचाकी वाहने आवश्यक आहेत. सध्या तीनच उपलब्ध असून, तीही वारंवार बिघडतात. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.