इचलकरंजीत कॉँग्रेसच्या सत्तेला सुरूंग !

By admin | Published: January 6, 2015 09:09 PM2015-01-06T21:09:35+5:302015-01-06T21:53:31+5:30

नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर : ‘शविआ’च्या पाठिंब्यामुळे पक्षामध्ये अस्वस्थता

Ichalkaranji is in power of Congress! | इचलकरंजीत कॉँग्रेसच्या सत्तेला सुरूंग !

इचलकरंजीत कॉँग्रेसच्या सत्तेला सुरूंग !

Next

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी बंड केल्याने नगरपालिकेतील कॉँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉँग्रेसचे काही नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर उभे आहेत, तर शहर विकास आघाडीने दिलेला पाठिंबा यामुळे कॉँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.
२०११ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिकेमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी करताना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासह पाणी पुरवठा समिती, आरोग्य व महिला बालकल्याण या समित्या कॉँग्रेसच्या वाट्याला, तर बांधकाम व शिक्षण या दोन समित्या राष्ट्रवादीच्या वाटयाला अशी सत्तेची वर्गवारी झाली. सुरूवातीची अडीच वर्षे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण असल्याने पालिकेतील रत्नप्रभा भागवत, सुप्रिया गोंदकर, सुमन पोवार व बिस्मिल्ला मुजावर यांना नगराध्यक्षपद मिळाले. त्यानंतर अडीच वर्षांच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला, असे आरक्षण असल्याने आणि नगराध्यक्षपदासाठी सहा नगरसेविका इच्छुक असल्याने प्रत्येकीला पाच महिने याप्रमाणे नगराध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला ठरविण्यात आला.
या फॉर्म्युल्याप्रमाणे शुभांगी बिरंजे यांना पहिल्या पाच महिन्यांचे नगराध्यक्षपद देण्यात आले; पण बिरंजे यांच्या कार्यकाळात सुरूवातीला नगरपालिका कर्मचाऱ्यांचा झालेला संप आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची असलेली आचारसंहिता यामुळे त्यांना पूर्णवेळ कारभार पाहता आला नाही, असे कारण देत बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.
दरम्यान, एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना, तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आवाडे यांना हार पत्करावी लागली. विधानसभा निवडणुकीत आवाडे यांना आलेल्या अपयशाचे कारण नगरपालिकेतील
कारभाराविषयी नागरिकांची असलेली नाराजी असा निकष काढण्यात आला. वास्तविक पाहता नगरपालिकेमध्ये असलेली गोंधळाची परिस्थिती आणि येथे होणारे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार यामुळे सत्तारूढ कॉँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यातच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला हार पत्करावी लागल्याने कॉँग्रेसच्या नेतृत्वाचा दबाव काहीसा प्रभावहीन झाल्याचे मत राजकीय क्षेत्रात आहे. याच कारणामुळे कॉँग्रेसच्या नगरसेवकांपैकी बारा-तेरा नगरसेवकांचा गट सध्या नाराज आहे. नगराध्यक्षांच्या या बंडाच्यानिमित्ताने तो फुटून विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशा पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांच्या बंडाला शहर विकास आघाडीच्या १७ नगरसेवकांनी आणि राष्ट्रवादीतील कारंडे गटाच्या चार नगरसेवकांनी उघडपणे पाठिंबा व्यक्त केला आहे. नगराध्यक्षांचे बंड, कॉँग्रेसमध्ये होणारी संभाव्य फूट
आणि शहर विकास आघाडीचा पाठिंबा या कारणांमुळे येथील इचलकरंजी कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नगराध्यक्षांच्या बंडांचे रहस्य
नगराध्यक्षा बिरंजे यांची निवड झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीपर्यंत त्यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. नेमका याच कायद्याचा लाभ त्यांनी हे बंड करताना उठविला आहे.
त्यांची निवड होऊन चार महिने झाले असून, आणखीन सात महिने त्यांच्यावर अविश्वास आणता येणार नाही आणि अविश्वास आणल्यास त्यांना ५७ पैकी ४३ नगरसेवकांच्या संख्याबळाने पदावरून दूर करता येते;
सध्या तरी शहर विकास आघाडी, राष्ट्रवादीतील कारंडे गट अशा २२ नगरसेवकांचा पाठिंबा पाहता बिरंजे यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. अशा काहीशा कचाट्यात इचलकरंजीची शहर कॉँग्रेस सापडली आहे.

Web Title: Ichalkaranji is in power of Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.