इचलकरंजीत सायझिंग कामगारांचा संप चिघळणार

By Admin | Published: August 9, 2015 01:54 AM2015-08-09T01:54:45+5:302015-08-09T01:54:45+5:30

लढा चालूच राहणार : ए. बी. पाटील; उद्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांची विनंती फेटाळली

Ichalkaranji seising workers will get lost | इचलकरंजीत सायझिंग कामगारांचा संप चिघळणार

इचलकरंजीत सायझिंग कामगारांचा संप चिघळणार

googlenewsNext

इचलकरंजी : गेल्या वीस दिवसांपासून लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीपर्यंत सायझिंग कामगारांनी सुरू केलेला बेमुदत संपाचा लढा चालूच राहील, असा निर्धार कामगार नेते ए. बी. पाटील यांनी शनिवारी कामगारांच्या मेळाव्यात व्यक्त केला. तसेच उद्या, सोमवारी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा केल्याने संप चिघळण्याची चिन्हे आहेत.
संपावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरली होती. सायझिंगधारक कृती समितीने वेतन न्यायप्रविष्ठ असल्यामुळे पगारवाढ न देण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे, तर यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी हा संप सायझिंगचा असल्यामुळे त्यामध्ये आपला संबंध येत नाही, अशी भूमिका घेतली. एकूणच मंत्रालयातील कामगारमंत्र्यांसमोर झालेली बैठक आणि प्रांत कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा तोडगा निघण्यासाठी प्रयत्न होऊनसुद्धा सायझिंग कामगारांचा संपाचा निर्णय कायम राहिला.
दरम्यान, शुक्रवारच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दोन महिने संप स्थगित ठेवण्याची विनंती केली. मात्र, कामगार संघटनेने शनिवारी कामगारांच्या मेळाव्यात सर्वांची मते जाणून घेऊन संपाबाबत निर्णय जाहीर करू, असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी थोरात चौक येथे झालेल्या कामगार मेळाव्यात नेते पाटील यांनी वरीलप्रमाणे संप चालूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
ते म्हणाले, किमान वेतनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असला, तरी त्याला स्थगिती नसल्याने अंमलबजावणी करण्यास काहीच अडचण नाही. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर जाणाऱ्या मोर्चाच्यावतीने सरकारी कामगार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल, असेही पाटील यांनी घोषित केले. मेळाव्यात सुभाष निकम, आनंदराव चव्हाण, कृष्णात कुलकर्णी यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.
कोंडी फोडण्यासाठी खासदार, आमदारांकडून बैठक
यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी गेले वीस दिवस सायझिंग संप सुरू आहे. संपाची कोंडी फुटण्यासाठी शनिवारी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सुरेश हाळवणकर यांनी कामगार व सायझिंगधारक यांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केली. संपाला वीस दिवस होत आले असतानाही लोकप्रतिनिधी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याबद्दल टीका होऊ लागली. या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार हाळवणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात रात्री कामगार नेते ए. बी. पाटील, सुभाष निकम आदींबरोबर चर्चा झाली. त्यानंतर रात्री उशिरा सायझिंगधारक कृती समितीच्या प्रतिनिधीबरोबर वेगळी चर्चा झाली. आज तोडगा दृष्टिक्षेपात नसला तरी चर्चेतून संपाची कोंडी फोडण्यास सुरुवात करीत असल्याचे आमदार हाळवणकर यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ichalkaranji seising workers will get lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.