इचलकरंजीत पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: June 10, 2015 11:44 PM2015-06-10T23:44:52+5:302015-06-11T00:20:44+5:30
युवक काँग्रेसचे आंदोलन : रेशन धान्याचा पुरवठा सुरळीत करा
इचलकरंजी : गोरगरीब जनतेला हक्काच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र शासनाचा निषेध करत केसरी शिधापत्रिकाधारकांना तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी येथील युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी एम. ए. शिंदे यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गत दहा महिन्यांपासून केसरी शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील गहू व तांदूळ मिळालेला नाही. तो का देण्यात आला नाही, कशासाठी धान्याचे वितरण थांबविण्यात आले आहे, याची विचारणा करीत शिंदे यांना आंदोलकांनी धारेवर धरले आणि अन्नधान्याचा पुरवठा तातडीने व्हावा, या मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात, ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्ता मिळविणाऱ्या भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून जनतेला मिळणाऱ्या सुविधा दुरापास्त होऊ लागल्या आहेत. इचलकरंजी व परिसरातील कष्टकरी कामगार हे शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधांवरच अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व सवलतीच्या दरातील अन्नधान्य, रॉकेल याचा वेळेत पुरवठा होणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. तरी या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन तातडीने धान्याचा पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाचा स्वीकार करून पुरवठा निरीक्षण अधिकारी शिंदे यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अमृत भोसले, उपाध्यक्ष सचिन माच्छरे यांच्यासह रवी जावळे, राजू बोंद्रे, सचिन लायकर, भारत बोंगार्डे, समीर शिरगावे, कुशल सिंगी, प्रमोद पोवार, कपिल शेटके, सूरज राठी, आदींसह युवा कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. (वार्ताहर)