इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी तीन मुलांचा घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 06:55 PM2021-03-09T18:55:08+5:302021-03-09T18:57:30+5:30
DogBite Hospital Ichlkarnaji Kolhapur- जवाहरनगर येथील तीन मुलांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. एकाच वेळी तीन मुलांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पालिकेने कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
इचलकरंजी : जवाहरनगर येथील तीन मुलांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. एकाच वेळी तीन मुलांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पालिकेने कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
आदित्य अनिल शिरगावे (वय ६, रा. स्वामी कारखान्याजवळ), अरफान रफिक बागवान (अडीच वर्षे, रा. मासाळ गल्ली) व वेदांत प्रभाकर सुतार (१३, रा. जवाहरनगर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जवाहरनगर येथे सकाळच्या सुमारास परिसरातील मुले घराबाहेर खेळत होती. त्यावेळी भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामध्ये आदित्य याच्या मांडीला व पृष्ठभागाला आणि अरफान याच्या छातीच्या उजव्या बाजूला चावा घेतला. त्यामुळे मुले आरडाओरडा करू लागले.
त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. कुत्र्याच्या तावडीतून मुलांना सोडवून आयजीएम रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जवाहरनगरातील वेदांत याच्या पायाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्यालाही आयजीएम दाखल केले आहे. परिसरातील घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
भटक्या कुत्र्यांचा उच्छांद
पंधरा दिवसांपूर्वी तांबे माळ, लिंबू चौक , गुरूकन्नननगर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी दहा ते बाराजणांचा चावा घेतला होता. त्यावेळी परिसरातील नागरिक काठी घेवून मध्यरात्रीपर्यंत या कुत्र्यांचा पाठलाग करीत होते. भटक्या कुत्र्यांचा उच्छांद वाढला असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.