इचलकरंजीत आज मराठा जागरण फेरी

By admin | Published: October 13, 2016 02:02 AM2016-10-13T02:02:55+5:302016-10-13T02:02:55+5:30

वैद्यकीय मदतीसाठी ८० पथके : फेरीमध्ये सव्वा लाख लोक सहभागी होण्याचा अंदाज; संयोजक, पोलिस प्रशासनाची नियोजन बैठक

Ichalkaranji today marks the Maratha Jagaran Phari | इचलकरंजीत आज मराठा जागरण फेरी

इचलकरंजीत आज मराठा जागरण फेरी

Next

इचलकरंजी : इचलकरंजीत आज, गुरुवारी आयोजित केलेल्या मराठा क्रांती जनजागरण फेरीसाठी बुधवारी मराठा सांस्कृतिक भवनामध्ये संयोजक व पोलिस प्रशासन यांची व्यापक बैठक झाली. फेरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आवश्यकता भासल्यास तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध होण्याकरिता दोन हजार युवक व पाचशे युवतींची ८० पथके स्थापन केली. फेरीच्या अंतिम टप्प्यात राजाराम स्टेडियमवर येणाऱ्या महिला-पुरुषांसाठी ४०० महिला व पुरुषांचे पथक नेमण्यात आले.
इचलकरंजीतील मराठा क्रांती जनजागरण फेरीमध्ये एक लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे फेरीमध्ये गोंधळ उडू नये, अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याकरिता, तसेच नियंत्रण ठेवणे व गरजूंना ताबडतोब वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी दोन हजार युवक व पाचशे युवतींची ८० पथके नेमण्यात आली. ही पथके मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी थांबून वरीलप्रमाणे काम करतील. मोर्चाच्या मार्गावर प्रत्येक चौकात रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक ठेवणार आहे.
राजर्षी शाहू पुतळ्यापासून निघणारा हा मोर्चा शिवाजी पुतळा, जनता चौक, महात्मा गांधी पुतळा, सुंदर बाग, शाहू कॉर्नर मार्गे जनता चौक, बंगला रोडवरून राजाराम स्टेडियममध्ये स्थिरावणार आहे. सुरुवातीला शालेय विद्यार्थिनी-युवती, त्यानंतर महिला, त्यानंतर शालेय विद्यार्थी-युवक, पुरुष आणि अखेरीस विविध राजकीय पक्षांचे नेते असा फेरीचा क्रम राहणार आहे. फेरी राजाराम स्टेडियमच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारातून स्टेडियममध्ये प्रवेश करेल. विद्यार्थिनी, युवती व महिलांना मैदानात आणि त्यानंतर येणाऱ्या पुरुषांना स्टेडियमच्या गॅलरीमध्ये शिस्तबद्धरीत्या बसविण्यात येईल. प्रांत कार्यालयातील प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यासाठी दहा युवतींचे एक पथक तहसीलदार वैशाली राजमाने यांच्याबरोबर प्रांत कार्यालयात जाईल. दरम्यानच्या काळात मैदानामध्ये एक युवती मराठा क्रांती मोर्चावरील कविता वाचन करेल. दुसरी युवती भाषण करेल, तर तिसरी युवती आभार मानेल. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन फेरीची सांगता होईल.
फेरीत सहभागी झालेले लोक पुढे निघून गेल्यानंतर पथकातील स्वयंसेवकांकडून मोर्चाच्या मार्गावरील सर्व प्रकारचा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. त्याचप्रमाणे स्टेडियम रिकामे झाल्यानंतर स्टेडियम आणि स्टेडियमच्या परिसरामध्ये झालेला कचरा मोर्चाचे संयोजक व स्वयंसेवकांकडून स्वच्छ केला जाईल, असे बुधवारच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)

जागरण फेरीची आचारसंहिता
जागरण फेरीचे आयोजक - मराठा मंडळाचे अध्यक्ष सुनील शेलार यांनी बुधवारच्या बैठकीमध्ये आचारसंहितेचे वाचन केले. आचारसंहितेतील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
जनजागरण फेरी एका संवेदनशील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी असल्यामुळे तिला उत्सवी स्वरूप प्राप्त करू न देता ही मूक फेरी असल्याचे काटेकोर पालन करावे. फेरीमध्ये फक्त भगवे झेंडेच राहतील.
फेरीमधील फलकांवर कोणत्याही राजकीय नेत्याची छबी असता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचीच छायाचित्रे फलकावर असावीत. कोणत्याही संघटना किंवा संस्थांच्या नावाचे फलक असणार नाहीत.
फेरीला येताना आणि परत जाताना शांतपणा व शिस्तीचे पालन करावे. फेरी कोणत्याही समाजाच्या विरोधात नसल्यामुळे अन्य समाज दुखावेल, अशा कोणत्याही स्वरूपाच्या घोषणा फलकांवर असू नयेत, आदींचा उल्लेख फेरीच्या आचारसंहितेमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वारणा, मुस्लिम समाज, जनता बॅँकेतर्फे पाणी वितरण
इचलकरंजीतील मराठा क्रांती जनजागरण फेरीमध्ये वारणा उद्योग समूहाकडून २०० मिलि स्वच्छ पाण्याचे तीन लाख पाऊच वितरित करण्यात येणार आहेत.
फेरी स्टेडियममध्ये आल्यानंतर इचलकरंजीतील समस्त मुस्लिम समाजाकडून दहा टन केळी व स्वच्छ पाण्याचे एक लाख पाऊचचे वाटप करण्यात येणार आहे.
या वाटपासाठी मुस्लिम समाजाकडून २५० युवकांची वेगवेगळी चार पथके तयार करण्यात आली आहेत, तर कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बॅँकेकडून शाहू पुतळा येथे (ज्या ठिकाणी फेरीची सुरुवात होणार आहे) स्वच्छ पिण्याचे पाणी दिले जाणार आहे.

Web Title: Ichalkaranji today marks the Maratha Jagaran Phari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.