इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Published: March 15, 2017 12:11 AM2017-03-15T00:11:38+5:302017-03-15T00:11:38+5:30

‘कृष्णे’च्या दाबनलिकेला भगदाड : कमकुवत, गळक्या दाबनलिकेचा विषय ऐरणीवर; क्लॅपिंग करून गुरूवारपासून पुरवठा पूर्ववत होणार

Ichalkaranji water supply disrupted | इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत

इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत

Next

इचलकरंजी : शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ योजनेच्या तेरवाड (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्यालगत नदीपात्रातील दाबनलिकेला भगदाड पडले असून, ते दुरूस्त होईपर्यंत येथील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत झाला आहे. दाबनलिकेवर नदीचे पाणी असल्यामुळे त्याठिकाणी वेल्डींगऐवजी क्लॅपिंग करून पाणीपुरवठा गुरूवार (दि.१६) पासून पूर्ववत होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे कमकुवत व गळके झालेल्या दाबनलिकेचा विषय ऐरणीवर आला आहे.
इचलकरंजीस पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना आहेत. यापैकी सन १९८० मध्ये सुरू झालेली पंचगंगा योजना असून, तिच्यावरील पाणी उपसा करणारे पंप व संबंधित यंत्रणा कालबाह्य झाली असल्याने या योजनेद्वारे वीस दशलक्ष लिटरऐवजी प्रतिदिन पाच ते सहा दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते आहे. तर सन २००१ मध्ये कार्यान्वित झालेल्या कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेला वारंवार गळती लागत असल्याने दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी पुरविण्याची क्षमता असलेल्या या योजनेद्वारे सरासरी ३६ दशलक्ष लिटर इतकेच पाणी शहरापर्यंत पोहोचते. त्यापैकी कृष्णा नळ योजना गळतीमुळे हैराण झाली असून, ती वारंवार बंद पडत असल्याने शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका जमिनीवरून टाकण्याचे मूळ निविदा असताना सुद्धा त्यावेळी कुरूंदवाड, शिरढोण व टाकवडे येथील शेतकऱ्यांनी दाबनलिका जमिनीवरून टाकण्यास जोरदार विरोध केला. परिणामी जीवन प्राधिकरणाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सदरची दाबनलिका जमिनीखालून टाकली. या दाबनलिकेवर जमिनीतील खत आणि पाण्याची रासायनिक प्रक्रिया होऊन सदरची नलिका कमकुवत झाली. त्याचा परिणाम म्हणून या दाबनलिकेला पाण्याचा दाब सहन होत नसल्याने सडलेल्या दाबनलिकेला केव्हाही आणि कुठेही छिद्र पडते किंवा भगदाडही पडते. तेरवाड बंधाऱ्याजवळून आलेली ही दाबनलिका तेथील पंचगंगा नदीच्या पात्रातील पाण्याखाली बुडालेली असते. नेमक्या याच ठिकाणी पाण्यातील नलिकेला भगदाड पडले असल्याने त्याठिकाणी वेल्डींगद्वारे पॅच बसविता येत नाही. म्हणून पाणबुड्यांच्या सहाय्याने तेथे क्लॅपिंग करण्याचे काम आज, बुधवारी चालणार असल्याची माहिती जलअभियंता सुरेश कमळे यांनी दिली. त्यामुळे आज, बुधवारी रात्री कृष्णा नदीतील पाण्याचा उपसा पुन्हा सुरू होईल व उद्या, गुरूवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)


काम युद्धपातळीवर करण्याची मागणीकृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पाणी उपशासाठी लागणारी यंत्रणा बदलण्यासाठी गतवर्षी राज्य शासनाकडून २७ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली होती. मात्र, शहरास वारणा नळ पाणी योजना होणार असल्याने सदरची निविदा रद्द करण्यात आली. आता वारणा योजना वाढविण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी आवश्यक आहे.
या कालावधीत कृष्णा योजनेच्या सडलेल्या दाबनलिकेवरच शहराचा पाणी पुरवठा अवलंबून राहणार आहे. दाबनलिकेस मात्र वारंवार गळती होत असल्याने विशेषत: उन्हाळ्यात वारंवार पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे वारणा योजनेचे काम युद्धपातळीवरून करून सदरची योजना एक वर्षामध्ये कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.


इचलकरंजीस पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेला तेरवाड बंधाऱ्याजवळ भगदाड पडले आहे. इनसेटमध्ये भगदाड व त्यावरील उचकटलेला नलिकेचा भाग.

Web Title: Ichalkaranji water supply disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.