इचलकरंजीत रिमझिम पावसातच अनेक ठिकाणी साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:17 AM2021-06-17T04:17:07+5:302021-06-17T04:17:07+5:30
इचलकरंजी : पावसाळा सुरू झाल्याने सध्या शहर व परिसरात काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. खऱ्या पावसाला अद्याप सुरुवात ...
इचलकरंजी : पावसाळा सुरू झाल्याने सध्या शहर व परिसरात काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. खऱ्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तरी थोड्याशा पावसाने शहरात अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. तर मुख्य रस्त्यावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील पाटील मळा परिसरात गटर तुंबल्यामुळे तेथील दुकानाच्या दारात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गटारी तुंबून पाणी साठत असल्याने सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर व दुकानात शिरत आहे. त्यामुळे भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी याबाबत नगरपालिकेत तक्रार देऊनसुद्धा कोणतेही काम होताना दिसत नाही.
तसेच मुख्य मार्गावरील के. एल. मलाबादे चौक परिसरात असलेल्या दुकानासमोर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे. गटारी तुंबल्याने व पाणी निचरा होण्यास मार्ग नसल्याने रस्त्यावरच पाणी साचून राहिले आहे. या मार्गावर नेहमी वर्दळ असल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. तसेच या भागातील व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेने त्वरित या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी भागातील नागरिकांतून होत आहे.
नागरिक आरोग्य काळजीने चिंताग्रस्त
सध्या शहर व परिसराला कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. प्रत्येक नागरिक या महामारीपासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी करत आहे. मात्र नगरपालिका आरोग्यविषयक बाबींवर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात इतर अनेक साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजीने चिंताग्रस्त झाले आहेत.
फोटो ओळी
1) इचलकरंजीतील मुख्य मार्गावरील के. एल. मलाबादे चौक परिसरातील दुकानासमोर साचलेले पाणी.
2) पाटील मळा परिसरात गटर तुंबल्यामुळे तेथील दुकानाच्या दारात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.