इचलकरंजी टेक्स्टाईल हब बनविणार : चंद्रकांतदादा
By admin | Published: November 16, 2015 12:44 AM2015-11-16T00:44:13+5:302015-11-16T00:44:36+5:30
लेखाजोखा प्रकाशन : यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करणार; हाळवणकरांना लवकरच कॅबिनेटचा दर्जा
इचलकरंजी : आमदार सुरेश हाळवणकर यांना कॅबिनेटचा दर्जा असलेले पद देण्याबरोबरच शहराला लवकरच टेक्स्टाईल हब बनविण्यात येणार आहे. तसेच यंत्रमाग कामगार कल्याण मंडळही स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीरपणाने दिले.
येथील लायन्स क्लबच्या हॉलमध्ये आमदार हाळवणकर यांच्या पहिल्या वर्षातील कामकाजाचा लेखाजोखा प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पाटील म्हणाले, हाळवणकर हे अभ्यासू आमदार असून मागच्या कार्यकालाच्या अभ्यासपूर्ण कामकाजामुळे त्यावेळीच त्यांचा सविस्तर बायोडाटा मागवून घेण्यात आला होता. पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारातच त्यांची वर्णी लागली असती. मात्र, काही राजकीय घडामोडींमुळे ते प्रलंबित राहिले. असे असले तरी शहरासाठी त्यांनी ज्या-ज्या मागण्या आपल्याकडे केल्या आहेत, त्या पूर्ण केल्या जात आहेत. स्व. दत्तोपंत ठिगळे यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ या नावाने लवकरच कामगारांसाठी मंडळ स्थापण्यात येईल.
हाळवणकर यांनी सादर केलेला टेक्स्टाईल पॉलिसी अहवाल स्वीकारण्यात आला असून, त्याप्रमाणे अधिवेशनानंतर नवीन टेक्स्टाईल धोरण जाहीर केले जाईल. ठरल्याप्रमाणे यंत्रमागाचे विजेचे दर कमी होतील व पाच वर्षे ते स्थिर राहतील, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा बिरंजे यांनी, आपल्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत या सात-आठ महिन्यांतील कालावधीतच आपण मोकळा श्वास घेतला आहे. आमदारांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व योजनांना नगरपालिका पाठिंबा देईल, असे जाहीर करून वेळोवेळी ‘व्हिप’चे हत्यार वापरले जात असले तरी तेही दीर्घकाळ टिकणार नाही, असा टोला काँग्रेसला दिला.
स्वागत शहर अध्यक्ष विलास रानडे यांनी केले. प्रास्ताविकात आमदार हाळवणकर यांनी आपल्या कामकाजाचा सविस्तर लेखाजोखा मांडून यासाठी सहकार्य लाभलेल्या सर्व घटकांचे आभार मानले. यावेळी खासदार पाटील, अरुण इंगवले, अशोक स्वामी, अजित जाधव आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमास तानाजी पोवार, मदन झोरे, प्रमोद पाटील, आदींसह नगरसेवक, भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शहाजी भोसले यांनी केले. (वार्ताहर)
आवाडेंवर चौफेर टीकास्त्र
खासदार संजयकाका पाटील यांनी आपल्या भाषणात आवाडेंच्या घराणेशाहीवर टीका केली. तसेच हिंदुराव शेळके यांनी आवाडेंच्या सर्व संस्थांची चौकशी लावली, तर तीनवेळा या संस्था विकल्या तरी भागणार नाही, एवढा घोटाळा यामध्ये आहे. आता यशवंत प्रोसेसर्स हडप करण्याचा डाव सुरू आहे, अशी
टीका केली.
तर अजित जाधव यांनी, विधानसभा निवडणुकीत आवाडेंनी नगरपालिकेप्रमाणे निवडणूक लढवली. अनेक आमिषे दाखवूनही पराभूत झाले. निकालानंतर काही दिवस त्यांना पराभव मान्य होत नव्हता.