इचलकरंजीत वीस तास वीज गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:04 AM2019-04-29T00:04:15+5:302019-04-29T00:04:20+5:30
इचलकरंजी : शनिवारी (दि. २७) रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील दक्षिण परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून विद्युत तारा ...
इचलकरंजी : शनिवारी (दि. २७) रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील दक्षिण परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून विद्युत तारा तुटणे, वीज खांब वाकणे व पडणे, तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. वादळी वाºयाबरोबर गायब झालेला वीजपुरवठा तब्बल वीस तासांनंतर सुमारे ६० टक्के परिसरात सुरू झाला होता. यामध्ये महावितरण कंपनीचे सुमारे ४० लाख, तर झाडे पडून व पत्रे उडाल्याने झालेले नुकसान सुमारे एक कोटी रुपये असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांच्या असह्य उकाड्यानंतर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहराच्या दक्षिण बाजूकडून आलेल्या वादळी वाºयामुळे गावभागापासून मंगळवार पेठ तसेच तांबे माळ परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली, तर काही झाडांच्या फांद्या पडून वीजवाहिन्या तुटल्या. याचा परिणाम म्हणून शहरातील सुमारे तीस टक्के भागामधील वीजपुरवठा खंडित झाला.
दक्षिण परिसरातून अचानकपणे आलेल्या सोसाट्याच्या वाºयाचा झोत शहरात शिरला. त्यामुळे नदीवेस नाका परिसर, गणपती मंदिर परिसर, मरगुबाई मंदिर, लक्ष्मी दड्ड, नरसोबा कट्टा, आंबी गल्ली, कागवाडे मळा, दातार मळा, तांबे माळ, रिक्रिएशन हॉल-मंगळवार पेठ, ब्लड बॅँक, नाट्यगृह परिसर अशा व्यापक भागांमध्ये अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही झाडे उन्मळून पडली. या प्रकारामध्ये गावातील अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्या तुटल्या, तर दहा ठिकाणी विजेचे खांब आणि शेतीतील चौदा विजेचे खांब उखडले. याशिवाय सुमारे ४२ ठिकाणी विजेचे खांब वाकले.
आवाडे मळा परिसरात असलेल्या महावितरण कंपनीच्या उपकेंद्रातही ११ केव्हीए विद्युत वाहिनीवर दोन झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे उच्चदाबाची वाहिनीसुद्धा बंद पडली. सुमारे अर्धा तासांनंतर वारे व किरकोळ पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. अधिकारी व कर्मचाºयांनी नियोजन करून आवाडे मळ्यातील उपकेंद्रामध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी तुटलेल्या विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम सुरू केले. रात्री तीन वाजेपर्यंत विजेचा पुरवठा करणारे दहा फिडर सुरू करण्यात आले होते. सकाळ झाल्यानंतर सुमारे १५० कर्मचारी वीजवाहिन्या जोडणे, खांब उभा करणे, तसेच झाडांच्या पडलेल्या फांद्या बाजूला करणे, त्याचबरोबर उन्मळून पडलेली झाडे तोडून दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रविवारी सायंकाळी आपद्ग्रस्त परिसरामधील विद्युत वाहिन्या दुरुस्त करून सुमारे ७० टक्के परिसरातील वीजपुरवठा सुरू केला होता.