इचलकरंजीवासीयांना बसणार टंचाईच्या झळा--कृष्णा नळयोजनेची दाबनलिका --
By admin | Published: July 29, 2016 09:14 PM2016-07-29T21:14:09+5:302016-07-29T23:19:41+5:30
बदलण्याचा प्रस्ताव रद्दच्या हालचाली वारणा योजना मंजूर झाल्याचा परिणाम
इचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणारी नळ योजना मंजूर झाल्याने कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेची दाबनलिका बदलण्याची २७ कोटी रुपयांची निविदा रद्द करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. परिणामी अत्यंत कुचकामी झालेल्या दाबनलिकेला वारंवार गळती लागत असल्याने शहरवासीयांना आता तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, नळपाणी योजनेबाबत गुरूवारी मुंबईत शासन स्तरावर झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा व कृष्णा या नदीतून पाणी उपसा करणाऱ्या दोन योजना सध्या कार्यान्वित आहेत. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यानंतर जानेवारी ते जून असे सहा महिने तिथून होणारा पाणीपुरवठा ठप्प होतो. त्यामुळे फक्त कृष्णा नदीतील पाणीपुरवठ्यावर शहराला चार ते पाच दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो. कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यानंतर तिथून होणारा पाणीपुरवठासुद्धा ठप्प होतो. तर १९ किलोमीटर लांबीच्या या योजनेची दाबनलिका जमिनीखालून टाकण्यात आल्यामुळे ती अत्यंत कुचकामी झाली आहे. त्यापैकी सात किलोमीटर लांबीची दाबनलिका यापूर्वी बदलण्यात आली आहे. उर्वरित अकरा किलोमीटर लांबीची दाबनलिका बदलण्याचा २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्यात आला.
कृष्णा नदीची दाबनलिका बदलण्यासाठी नगरोत्थान योजनेमधून २७ कोटी रुपये मंजूर झाले. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आला. त्याप्रमाणे शासनाचा मिळणारा निधीसुद्धा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. जीवन प्राधिकरणकडून निविदा काढण्याच्या टप्प्यावर हे काम असताना नगरपालिका पाणीपुरवठा समितीचे सभापती दिलीप झोळ यांनी निविदा काढण्याचे काम नगरपालिकेमार्फत व्हावे, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
दरम्यान, वारणा नदीतून पाणी पुरवठा करणारी ७२ कोटी रुपयांची नवीन नळ पाणी योजना शासनाच्या अमृत योजनेतून मंजूर झाला आहे. त्यामुळे कृष्णा नळपाणी योजनेची दाबनलिका बदलण्याकामी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव रद्दबातल करण्याच्या हालचाली शासकीय स्तरावर सुरू आहेत. नळ योजनेबाबत गुरूवारी मुंबई मंत्रालयात प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये कृष्णा नळ पाणी योजनेचा विषय चर्चेला घेण्यात आला होता. त्यामुळे कृष्णा नळपाणी योजनेची दाबनलिका बदलण्याचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)