बालिका अत्याचारप्रकरणी इचलकरंजीकरांची वज्रमूठ : फाशीची मागणी; प्रांताधिकारी, पोलिसांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:36 AM2019-11-02T00:36:18+5:302019-11-02T00:45:55+5:30

घाडगे यांनी सर्व नागरिकांनी संयम ठेवावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपासाचे काम सुरळीत चालू असून, मोर्चा व निवेदन देण्यास येऊन पोलिसांचा वेळ घेण्यापेक्षा शांत राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Ichalkaranjikar's thunderbolt for girl abuse | बालिका अत्याचारप्रकरणी इचलकरंजीकरांची वज्रमूठ : फाशीची मागणी; प्रांताधिकारी, पोलिसांना घेराव

बालिका अत्याचारप्रकरणी इचलकरंजीकरांची वज्रमूठ : फाशीची मागणी; प्रांताधिकारी, पोलिसांना घेराव

Next
ठळक मुद्दे नागरिकांचा मोर्चा -मोहामेडन एज्युकेशन सोसायटीतर्फे निषेध, अन्य संघटनांची निवेदने

इचलकरंजी : बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चारही नराधमांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत शहरातील नागरिकांनी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मोर्चामधील संतप्त नागरिकांनी नराधमांची धिंड काढण्याची मागणी करत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार आणि प्रांताधिकारी विकास खरात यांना घेराव घालून घोषणाबाजी केली.

आठवर्षीय बालिकेवरील अत्याचार घटनेच्या शुक्रवारी सहाव्या दिवशीही नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकाळी अकरा वाजता राधाकृष्ण चौक परिसरासह अन्य भागांतील नागरिकांनी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, ‘नराधमांना फाशी द्या’, या घोषणांनी प्रांत कार्यालय परिसर दणाणून सोडला. विशेषत: मोर्चात सामील झालेल्या युवतींच्या हाती ‘वुई वॉन्ट जस्टीस’चे फलक झळकत होते. घाडगे, बिरादार व खरात यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी व महिलांनी आरोपींना बाहेर काढा व आमच्या स्वाधीन करा, अशा घोषणा सुरू केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. काही नागरिक व अधिकाऱ्यांत किरकोळ बाचाबाची झाली. सर्व अधिकाºयांनी योग्य प्रकारे तपास सुरू असून, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन दिले. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी खरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात राजकीय नेत्यांसह महिला-पुरुष सहभागी झाले होते.

संशयितांच्या घरांची झडती
इचलकरंजी : आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या चौघांच्या घरांची झडती पोलिसांनी घेतली. रोहित गजानन जाधव (वय १९, रा. गणेशनगर), सौरभ मकरध्वज माने (२०, रा. जयभीमनगर), शुभम नितीन भोसले (१९, रा. कोरोची, ता.हातकणंगले) व शकील अब्दुल शेख (२०, रा. जवाहरनगर) अशी चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यासह पूर्वी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानेही घरामध्ये तपासणी करण्यात आली. संशयितांकडे कसून चौकशी सुरू असून, अद्याप आणखीन काही माहिती पोलिसांच्या हाताला लागली नाही.

 

  • मुस्लिम समाजाचा विराट मूक मोर्चा -चौघा आरोपींना कठोर शिक्षा करा : अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

इचलकरंजी : बालिका अत्याचार प्रकरणातील चौघा आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करत जमियत उल्मा शहर इचलकरंजी संघटना आणि शहरातील मुस्लिम समाजाने शुक्रवारी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मोर्चात सहभागी झालेल्या छोट्या मुस्लिम बालिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक घाडगे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

वखारभाग परिसरात असलेल्या मस्जिदपासून दुपारी तीन वाजता मोर्चास सुरुवात झाली. शहर व परिसरातील मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी मुस्लिम बालिका निषेधांचे फलक घेऊन चालत होत्या.

के. एल. मलाबादे चौक, गांधी पुतळामार्गे फिरून हा मोर्चा अधीक्षक कार्यालयावर आला. यावेळी घाडगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

घाडगे यांनी सर्व नागरिकांनी संयम ठेवावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपासाचे काम सुरळीत चालू असून, मोर्चा व निवेदन देण्यास येऊन पोलिसांचा वेळ घेण्यापेक्षा शांत राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.

अन्य संघटनांची निवेदने
मूक मोर्चाची सांगता झाल्यानंतर महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठान, इचलकरंजी शहर बागवान जमियत या मुस्लिम संघटनांच्या शिष्टमंडळाने घाडगे यांची भेट घेतली. त्यांनी बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे, अशा मागणीची स्वतंत्र निवेदने दिली.


मोहामेडन एज्युकेशन सोसायटीतर्फे निषेध
कोल्हापूर : इचलकरंजी येथील आठ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आला. मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादरभाई मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, हाजी जहॉँगीर अत्तार, रफिक शेख, अल्ताफ झांजी, हमजेखान शिंदी, लियाकत मुजावर, फारूक पटवेगार, रफिक मुल्ला आदी उपस्थित होते.

दरम्यान, घटनेचा निषेध करत अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी सागर घोलप, प्रकाश साळोखे, सोमनाथ कोळी, तुषार जाधव, नितीन कांबळे, संजय जगताप, अमोल चिंदके आदी उपस्थित होते.

Web Title: Ichalkaranjikar's thunderbolt for girl abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.