इचलकरंजीचा अर्थसंकल्प जिल्हाधिकार्यांकडून परत
By admin | Published: May 27, 2014 12:38 AM2014-05-27T00:38:59+5:302014-05-27T00:41:32+5:30
८० कोटी रुपयांच्या उत्पन्नवाढीला आर्थिक स्रोत
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सन २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात दाखविण्यात आलेल्या ८० कोटी रुपयांच्या उत्पन्नवाढीला आर्थिक स्रोत दाखविण्यात यावे, अशा आशयाची मागणी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी इचलकरंजी पालिकेकडे केली असून, अर्थसंकल्प परत पाठविला आहे, अशी माहिती विरोधी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी दिली. नगरपालिकेचा अर्थसंकल्प परत पाठविणे ही गंभीर बाब असून, त्याचा गांभीर्याने विचार करावा याबाबत तातडीने दुरुस्ती करून हा अर्थसंकल्प जिल्हाधिकार्यांकडे मंजूर करण्यास पाठवावा, आवश्यकता भासल्यास विशेष सभा बोलवावी, अशी मागणी पक्षप्रतोद जाधव यांनी आज, सोमवारी नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर यांच्याकडे केली. इचलकरंजी पालिकेचा २४२ कोटी २७ लाख रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प २८ जानेवारीला सर्वसाधारण सभेत सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीने मंजूर केला होता. उत्पन्न वाढ पोकळ पद्धतीने दाखविल्याची तक्रार विरोधी शहर विकास आघाडीने केली; पण सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीला त्याचे गांभीर्य वाटले नाही. आता जिल्हाधिकारी माने यांनी या अर्थसंकल्पात दाखविलेल्या ८० कोटी रुपयांच्या उत्पन्नवाढीबाबत आर्थिक स्रोत दाखवावा अशा प्रकारची सूचना करीत हा अर्थसंकल्प पालिकेकडे परत पाठविला असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)