‘अमृत’मधून इचलकरंजीस ६५४ कोटींची विकासकामे

By admin | Published: October 1, 2015 11:23 PM2015-10-01T23:23:57+5:302015-10-01T23:23:57+5:30

पाणीप्रश्न सुटणार : काळम्मावाडी नळ योजना होणार

Ichalkaranji's development works worth `654 crore from Amrit | ‘अमृत’मधून इचलकरंजीस ६५४ कोटींची विकासकामे

‘अमृत’मधून इचलकरंजीस ६५४ कोटींची विकासकामे

Next

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या अर्बन अटल मिशन फॉर रिज्युव्हेनशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेमध्ये इचलकरंजीचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरास मूलभूत सुविधा देणारी ६५४ कोटींची कामे नजीकच्या पाच वर्षांत होण्याची खात्री निर्माण झाली आहे.राज्यातील ४३ शहरांचा अमृत सिटी योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. इचलकरंजी शहरासाठी स्वच्छ व शाश्वत पाणी देणारी काळम्मावाडी धरणातून थेट नळ योजनेचा अमृतमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी काळम्मावाडीची किंमत ५३८.७७ कोटी रुपये इतकी गृहीत धरण्यात आली आहे. याशिवाय शहरातील शहापूर व कबनूर वाढीव वसाहतीमध्ये नळाच्या जोडण्या देणे. शंभर टक्के नळ योजनेचे मिटरिंग करणे. जुनी भुयारी गटार योजनेचे नळ बदलणे व शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप बदलणे. तसेच शहर बस वाहतूक योजना सुरू करणे आणि शहरामध्ये हरित पट्टा तयार करणे. या बाबींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.
अमृत सिटी योजनेसाठी केंद्र सरकारकडून ३२७ कोटी रुपये व राज्य सरकारकडून १६३ कोटी रुपये असे अनुदान मिळणार आहे, तर नगरपालिकेला आपल्या हिश्श्यातील रक्कम १६३ कोटी रुपये घालावे लागणार आहेत. सरकारकडून मिळणारे अनुदान पाच वर्षांमध्ये समान पाच टप्प्यांत मिळणार असून, नगरपालिकेच्या हिश्श्याची दरवर्षी असणारी ३२ कोटी रुपयांची रक्कम नगरपालिकेला उभी करावी लागणार आहे. ही रक्कम दरवर्षी मिळणारा मालमत्ता कर वीस कोटी रुपये व पाणीपट्टी पंधरा कोटी रुपये यातून घेतली जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.सध्या नगरपालिका पंचगंगा व कृष्णा अशा दोन नद्यांतून पाण्याचा उपसा करते. दोन्ही नद्यांकडून सुमारे ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जाते.
मात्र, या पाण्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने ४४ टक्के पाणी वाया जाते. शहरामधील नळांना शंभर टक्के मिटरिंग केले असता पाण्याची २५ टक्के बचत होईल. त्याचप्रमाणे शहर बस वाहतुकीसारखी सर्वसामान्यांना परवडणारी वाहतूक उपलब्ध झाल्यामुळे इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरातील कामगार वर्गाची चांगलीच सोय होणार असल्याचे डॉ. रसाळ यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)


पुन्हा काळम्मावाडीच
साधारणत: एक महिन्यापूर्वी इचलकरंजी शहराचा अमृत सिटी योजनेमध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला असताना त्यावेळी काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणणारी खर्चिक नळ योजना ताबडतोब हाती घेऊ नये. ही योजना दीर्घ मुदतीची आहे.
परिणामी याला पर्यायी व कमी खर्चाची नळ योजना सूचवावी, असे शासनाने सूचित केले होते. म्हणून काळम्मावाडीला पर्याय म्हणून सुळकूड (ता. कागल) येथून दूधगंगा नदीतून पाणी आणणारी अल्प खर्चाची योजना सुचविण्याच्या हालचाली नगरपालिकेत सुरू झाल्या होत्या.
त्याबाबतची जोरदार चर्चा नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये झाली होती. तेव्हा दूधगंगा योजनेसाठी आजी-माजी खासदार व आमदार यांच्यासह बैठक घेण्यात येईल आणि त्याबाबत योग्य तो निर्णय केला जाईल, अशी ग्वाही शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी दिली होती. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी फक्त काळम्मावाडी योजनेचा प्रस्ताव शासनास दिल्यामुळे पालिका क्षेत्रात खळबळ उडाली होती.

Web Title: Ichalkaranji's development works worth `654 crore from Amrit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.