इचलकरंजी आगाराची 'दिवाळी'
By admin | Published: October 29, 2014 12:05 AM2014-10-29T00:05:02+5:302014-10-29T00:10:06+5:30
कार्य तत्परता : तीन दिवसांत ४२ लाखांचे उत्पन्न, एकूण सव्वा कोटीचे उत्पन्न अपेक्षित
अतुल आंबी -इचलकरंजी -जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या इचलकरंजी एस. टी. आगारास यंदा दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून एक कोटी २६ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, दिवाळीतील मुख्य तीन दिवसांत सुमारे ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण दिवाळी सुट्यांच्या कालावधीतील उत्पन्नाचा हा आकडा दीड कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. दिवाळीसारख्या सणात कर्मचाऱ्यांच्या डब्बल ड्युट्या आणि आगारप्रमुखांच्या योग्य नियोजनामुळे हे साध्य झाले आहे.
दिवाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण पर्यटनाला बाहेर पडतात, तर पाडवा, भाऊबीज यासाठी नातेवाईक पाहुण्यांकडे ये-जा करतात. एस. टी. खात्यातील कर्मचाऱ्यांना मात्र अशा सणावेळी डब्बल काम करावे लागते. यंदा येथील आगारप्रमुख किरण कुलकर्णी यांनी विभागीय सांख्यिकी अधिकारी अशोक कांबळे व डेपोचालक एस. डी. शांतिसम्राट, ए. आर. निकम यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी यांना बरोबर घेऊन, नियोजन करून दिवाळीमध्ये एसटीला अधिक उत्पन्न मिळविले आहे. दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून दररोज सरासरी बारा लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यातून सात दिवसांत ८४ लाख रुपये व दिवाळीच्या मुख्य तीन दिवसांत ४२ लाख रुपये असे एकूण एक कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुट्यांचा कालावधी संपेपर्यंत एकूण कालावधीतील उत्पन्नाचा हा आकडा दीड कोटींवर जाईल, असा अंदाज आगारप्रमुखांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीतील मुख्य तीन दिवसांत २५ आॅक्टोबर रोजी भाऊबीजनिमित्त १९ जादा गाड्या सोडण्यात आल्या. सांगली, मिरज, कोल्हापूर, निपाणी या प्रमुख मार्गांवर वाहतूक करण्यात आली. यामध्ये दिवसभरात एकूण ३५ हजार १११ किलोमीटर प्रवास होऊन १२ लाख २५ हजार ७२२ इतके उत्पन्न मिळाले. २६ आॅक्टोबरला पुणे येथे कोल्हापूर मार्गे १३ जादा गाड्यांची वाहतूक करण्यात आली. यामध्ये दिवसभरात ३३ हजार ८६० किलोमीटर वाहतूक होऊन १२ लाख ६३ हजार ७०६ उत्पन्न मिळाले. तर २७ आॅक्टोबरला दिवसभरात ३९ हजार ८०० किलोमीटर वाहतूक होऊन १६ लाख १४ हजार ७९७ इतके विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
गतवर्षी २०१३ मध्ये दिवाळीच्या तीन दिवसांत या आगाराने एक लाख ८४२ किलोमीटर प्रवास करून ३६ लाख ७५ हजार ९५८ रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. तर यंदा २०१४ ला दिवाळीच्या तीन दिवसांत एक लाख ८ हजार ७७१ किलोमीटरचा प्रवास करून ४१ लाख ४ हजार २२५ रुपयांचे उत्पन्न मिळविले. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत सात हजार ९२९ किलोमीटर जादा वाहतूक करून चार लाख २८ हजार २६७ रुपयांचा अधिक नफा मिळविला आहे. सध्या आगाराकडे १०८ बस , १९३ चालक आणि २४७ वाहक काम करतात. दररोजच्या वाहतूक नियंत्रणासाठी साधारण ५६ चालक कमी पडत आहेत. तरीही दररोज ८१२ फेऱ्या केल्या जातात. त्यासाठी काहीजणांना डब्बल ड्युटी करावी लागते. आगारप्रमुखांनाही अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यातून वाहतुकीचे नियोजन करताना अनेकवेळा डब्बल ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांना विनवणी करावी लागते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही होत आहे.
दिवाळीतील कामगिरी....
दररोज सरासरी बारा लाखांचे उत्पन्न
सात दिवसांत ८४ लाख रुपयांचे उत्पन्न
तीन दिवसांत १ लाख ८ हजार किलोमीटर वाहतूक
२०१३ मध्ये तीन दिवसांत ३६ लाख ७५,९८५ रुपये उत्पन्न
२०१४ मध्ये तीन दिवसांत ४१ लाख ४ हजार २२५ उत्पन्न