इचलकरंजीत अतिक्रमण काढले : कारवाईत १५ खोकी-गाडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:43 PM2017-12-06T23:43:12+5:302017-12-06T23:45:12+5:30
इचलकरंजी : नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पंधरा ठिकाणची खोकी व फेरीवाले गाडे जप्त केले.
इचलकरंजी : नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पंधरा ठिकाणची खोकी व फेरीवाले गाडे जप्त केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर केलेल्या कारवाईवेळी ५७ अतिक्रमणे संबंधितांनी स्वत:हून काढून घेतली, तर राजाराम स्टेडियमजवळ कारवाई सुरू असताना खोकीधारक व पथकातील कर्मचाºयांमध्ये झालेला वाद पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटविला.
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवार (दि. ५)पासून राजर्षी शाहू पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणविरोधी धडक मोहीम चालविली आहे. मोहीम सुरू असताना पोलिसांचे पथक बरोबर असल्यामुळे काही ठिकाणी वाद झाले तरी ते पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटविण्यात आले. परिणामी या धडक मोहिमेला चांगलाच वेग आला आहे.
राजाराम स्टेडियम परिसरात अतिक्रमण करून आॅटो स्पेअर पार्टस् विक्रीचे मोठे खोके बुधवारी या पथकाने जप्त केले. त्याचबरोबर पानपट्टीच्या खोक्यावर कारवाई सुरू असताना संबंधित खोकीधारकाने कर्मचाºयांना विरोध केला. मात्र, बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी खोकीधारकास पोलिसी भाषेत उत्तर दिल्यामुळे त्या ठिकाणचा वाद वाढला नाही. त्यानंतर या पथकाने के. पी. कॉम्प्लेक्सजवळील स्वेटर विक्री करणाºया दोन स्टॉलवर कारवाई केली. स्टॉल उभे करण्यासाठी वापरात आलेले प्लास्टिकचे कागद व काठ्या जप्त केल्या.
मराठा मंडळजवळील झुणका-भाकर केंद्राची एक गाडी व शिवाजी उद्यानाजवळील दोन खोकी उचलून ताब्यात घेतली. यावेळी वडा सेंटर चालविणाºया दोघाजणांकडून अनधिकृत असलेल्या स्वयंपाकाच्या तीन सिलिंडर टाक्यांवर कारवाई केली व त्या पुरवठा अधिकाºयांच्या ताब्यात दिल्या.
रस्त्यांकडेच्या कारवर लवकरच कारवाई
शहराच्या काही रस्त्यांवर कडेला गेले काही महिने चारचाकी गाड्या, जुन्या ट्रकच्या केबिन, तसेच नादुरुस्त ट्रॉली धूळ खात पडून आहेत. अशा गाड्या व ट्रकचे केबिन शोधून त्यांच्या मालकांना बाजार कर खात्याच्यावतीने आज, गुरुवारपासून नोटिसा बजाविण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती या पथकाकडून देण्यात आली. त्याचबरोबर आठवडाभरात अशा प्रकारचे रस्त्यावरील अतिक्रमण संबंधितांनी न हटविल्यास ते जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.