सीए फाउंडेशन परीक्षेत इचलकरंजीची निधी ललवाणी देशात पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:27 AM2021-02-09T04:27:53+5:302021-02-09T04:27:53+5:30
कोल्हापूर : नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या चार्टर्ड अकौंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल दि. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ ...
कोल्हापूर : नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या चार्टर्ड अकौंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल दि. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय)तर्फे सोमवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात इचलकरंजी (कोल्हापूर) येथील सर्वोदयनगरमध्ये राहणाऱ्या निधी दिनेशकुमार ललवाणी हिने देशात पहिला क्रमांक पटकावला. ४०० पैकी ३६१ गुणांची कमाई करीत निधीने हे यश मिळविले आहे.
इंटरमेडियेट परीक्षेत कोल्हापूर विभागातून प्रतिभानगर येथील सिद्धांत संतोष मेहता याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ८०० पैकी ५६५ गुण मिळविले. शाहूपुरीतील हर्षिल समकीत शाह याने ४९२ गुणांसह दुसरा, तर जिव्हाळा कॉलनी (लक्षतीर्थ वसाहत) कल्पेश बाळू पाटील याने ४६८ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. गंगावेश येथील श्रेयस चेतन दळवी आणि टिंबर मार्केट परिसरातील सागर महेंद्र पटेल यांनी चौथा क्रमांक मिळविला. त्यांनी प्रत्येकी ४६१ गुणांची कमाई केली. ‘आयसीएआय’कडून वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये फाउंऊंडेशन, इंटरमेडियेट परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातून ५०० विद्यार्थ्यांनी फाउंडेशनची, तर ४२० विद्यार्थ्यांनी इंटरमेडियेट परीक्षा दिली. त्यातील फाउंडेशन परीक्षेत निधी हिने देशात अव्वलस्थान पटकावले. तिने देशातील ७८ हजार विद्यार्थ्यांमधून हे यश मिळविले. ती मूळची राजस्थान येथील आहे. तिच्या वडिलांचा इचलकरंजीमध्ये कापड व्यवसाय असून, आई विमला गृहिणी आहेत. ती सध्या पुण्यातील चॉईस कॉलेजमधून बी. कॉम. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. दहावीमध्ये ९७ टक्के, तर बारावीमध्ये ९६.९६ टक्के गुणांसह ती उत्तीर्ण झाली होती. सीए फाउंडेशन अभ्यासक्रमाची तयारी तिने इचलकरंजीतील डीकेटीई इन्स्टिट्यूट आणि आयसीएआयच्या माध्यमातून केली. सिद्धांत मेहता हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या वडिलांचा पुस्तक विक्रीचा व्यवसाय असून, आई सोनाली या गृहिणी आहेत. भाऊ यश हा एमबीएचे शिक्षण घेत आहे. सिद्धांत याला दहावीत ९२.४ टक्के, तर बारावीला ८९.९० टक्के गुण मिळाले होते. सध्या पुण्यातील एस. पी. कॉलेजमधून तो बी. कॉम. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना ‘आयसीएआय’ कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए अनिल चिकोडी, उपाध्यक्ष तुषार अंतुरकर, सचिव सुशांत गुंडाळे, खजिनदार चेतन ओसवाल आदींचे मार्गदर्शन लाभले.