इचलकरंजीचे ज्ञानमंदिर गोविंदराव हायस्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:35 AM2019-06-24T00:35:35+5:302019-06-24T00:35:39+5:30
अतुल आंबी। लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : इचलकरंजीचे सरकार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सन १८९८ मध्ये गोविंदराव इंग्लिश स्कूलची ...
अतुल आंबी।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : इचलकरंजीचे सरकार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सन १८९८ मध्ये गोविंदराव इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तब्बल १२१ वर्षांचा प्रवास पूर्ण केलेल्या या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ना. बा. एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सध्या या प्रशालेसह मुलींसाठी वेगळी शाळा, पश्चिम महाराष्ट्रांतील पहिली तांत्रिक शिक्षण शाळा, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालय ज्ञानदानाचे अविरत कार्य करत आहेत.
सात-आठ विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या शाळेत सध्या हायस्कूलमध्ये १६८२ व ज्युनिअर कॉलेजमध्ये २१०० असे ३७८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थापनेवेळी ‘गोविंदराव इंग्लिश स्कूल’ असे त्याचे नाव होते. पुढे ‘गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज’ असे नामकरण झाले. गणेश विनायक ढवळे हे पहिले मुख्याध्यापक होते. सन १९१७-१८ मध्ये कृ. वि. ताम्हणकर हे दुसरे मुख्याध्यापक झाले. त्यांच्या कारकिर्दीत सन १९२७-२८ मध्ये दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू केले. विविध व्यवसाय शिक्षणाचीही सुरुवात केली. पुढे सन १९४२ जी. आर. चोळकर हे मुख्याध्यापक असताना तत्कालीन मुंबई प्रांतात प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.
सन १९४३ ला श्रीमंत नारायणराव बाबासाहेब यांचे निधन झाले. शाळेसाठी तो काळ थोडा बिकट गेला. १ मार्च १९४९ ला कोल्हापूर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. त्यानंतर सन १९५० मध्ये प्रशालेचे माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी शहरातील धनिकांकडून निधी संकलित केला. त्यावेळी श्रीकृष्ण डाळ्या, एफ. आर. शहा, ज्ञानदेव सांगले, एम. आर. जाधव, वाय. बी. दातार यांनी निधी दिला. त्यानंतर ६ नोव्हेंबर १९५० मध्ये संस्थेची घटना तयार करून संस्थेचे नाव ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे एज्युकेशन सोसायटी’ असे ठेवले. १ जानेवारी १९५२ रोजी शासनातर्फे हायस्कूल श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीस सुपूर्द केले.
सन १९६० मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिली तांत्रिक शिक्षण शाळेची (टेक्निकल स्कूल) सुरुवात केली. मुलींसाठी म्हणून ‘गोविंदराव हायस्कूल फॉर गर्ल्स्’ अशी वेगळी शाळा सन १९६८ मध्ये सुरू केली. पुढे त्या शाळेला ‘श्रीमंत गंगामाई गर्ल्स् स्कूल’ असे नाव दिले.
शाळेने सन १९७५ ला ज्युनिअर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालय (आर्टस्, कॉमर्स व सायन्स)ची स्थापना केली. सन १९७९ मध्ये ज्युनिअर विभागासाठी तांत्रिक व व्यवसायिक विभागाची स्थापना केली.
सन १९८३ मध्ये व्यंकटेश यांच्या नावाने वाणिज्य शाखेचे महाविद्यालय सुरू केले. सन १९८४ ला ज्युनिअर विभागासाठी द्विलक्ष्मी शिक्षण विभागाचे एमसीव्हीसी (किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण) विभागात रूपांतर केले. सन १९९९ मध्ये बालवाडी व प्राथमिक विभागाची (ना. बा. विद्यामंदिर) स्थापना केली.
सध्या लहान गटापासून ते उच्चशिक्षणापर्यंत, तसेच तंत्र शिक्षणासह वाणिज्य शिक्षणापर्यंत सर्व शिक्षणाच्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रशालेमार्फत नारायणराव बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्तही विविध स्पर्धा घेतल्या जातात.
संस्थेचे गेल्या चार दशकांपासून उद्योगपती मदनलाल बोहरा हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या दूरदृष्टी व परिश्रमानेही अनेक इमारती पूर्णत्वास आल्या. त्यासाठी त्यांना आजी-माजी पदाधिकाऱ्यांचीही साथ लाभली. सध्या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून हरीष बोहरा कार्यरत आहेत. उपाध्यक्ष उदय लोखंडे, सचिव बाबासाहेब वडिंगे व सर्व विश्वस्त मंडळ हा ज्ञानदानाचा रथ पुढे नेत आहेत.
संस्थेचे दिग्गज माजी विद्यार्थी
संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यात थोर चित्रकार सरदार पटेल (पी. सरदार), अमेरिकेतील तरुण संशोधक सुभाष खोत, यु.जी.सी.चे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर, संगीतकार आनंद इंगळे, रेडिओ फिक्वेन्सी पेटन्ट घेतलेले आशिष लड्डा, दीनेश काबरा, अमेरिकेत फेसबुक संशोधक विनय भागवत, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह अनेक यशस्वी इंजिनिअर, उद्योगपती, डॉक्टर याचा समावेश आहे.
प्रशालेला दिग्गजांच्या भेटी
माजी शिक्षणमंत्री अनंत नामजोशी, साहित्यिक ग. दि. माडगुळकर, इतिहास संशोधक ग. वा. पोतदार, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, आनंद यादव, शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई, हितेंद्र देसाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, फिल्म सृष्टीतील अभिनेते दिलीपकुमार, कमल हसन, हेमामालिनी, आदी दिग्गजांनी प्रशालेला भेटी दिल्या आहेत.