इचलकरंजीत घरकुल यादी आज प्रसिद्ध होणार

By admin | Published: September 26, 2016 11:48 PM2016-09-26T23:48:47+5:302016-09-27T00:02:26+5:30

नगरपालिकेच्या बैठकीत निर्णय : झोपडपट्टीधारकांचा ठिय्या; ६१२ लाभार्थ्यांच्या यादीवर हरकती, सूचना मागविणार

Ichalkaranji's house list will be published today | इचलकरंजीत घरकुल यादी आज प्रसिद्ध होणार

इचलकरंजीत घरकुल यादी आज प्रसिद्ध होणार

Next

इचलकरंजी : जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी तयार असलेल्या घरकुलांच्या ६१२ लाभार्थ्यांची यादी आज, मंगळवारी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. उर्वरित १०८ लाभार्थ्यांकरिता घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असलेले तीन कोटी २४ लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय सोमवारी नगरपालिका बैठकीत घेण्यात आला.
केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत शहरामधील जयभीम झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांचे अपार्टमेंट पद्धतीच्या घरामध्ये पुनर्वसन करण्यासाठी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गेल्या साडेचार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या इमारती पूर्णत्वास येत नसल्यामुळे संतप्त झोपडपट्टीवासीय आठवडाभरापासून नगरपालिकेसमोर उपोषण करीत आहेत. नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना घेराव घालून घरकुले पूर्ण करून ताब्यात मिळण्याची मागणी केली होती. त्यावेळी घरकुले तयार करणारा मक्तेदार बिपीन शहा यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले होते.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये घरकुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तेव्हा झोपडपट्टीवासीयांच्या घरकुलांच्या अनुदान निधीतून एक कोटी चार लाख रुपयांचा धनादेश मक्तेदाराला देऊन इमारती पूर्ण करून घेण्याचे ठरले होते. अशा पार्श्वभूमीवर सोमवारी लाभार्थ्यांच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. एक तासाहून अधिक काळ ठिय्या आंदोलन झाल्यानंतर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीसाठी उपनगराध्यक्ष महावीर जैन, मुख्याधिकारी डॉ. रसाळ, अभियंता संजय बागडे, मक्तेदार नरेंद्र कन्स्ट्रक्शनचे शहा, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, तसेच झोपडपट्टीवासीयांच्यावतीने विठ्ठल शिंदे, प्रकाश पाटील, नाना पारडे, संजय निकाळजे, हणमंत शिंदे, बनसोडे, संजय गवळी, आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये लाभार्थींच्यावतीने नगरपालिका प्रशासन व मक्तेदार शहा यांना धारेवर धरण्यात आले. चर्चेवेळी आरोप-प्रत्यारोप होत असल्याने वारंवार गोंधळ उडून तणाव निर्माण होत होता. सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर, ६१२ घरकुलांपैकी ४४४ घरकुलांचे अंतिम काम पूर्ण करून ती नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येतील. उर्वरित ८६८ घरकुले जी अंतिम टप्प्यात असून, त्यांचे काम अंशत: बाकी आहे. ती तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे ठरविण्यात आले. १०८ घरकुलांच्या इमारती बांधण्यास सुरुवात झालेली नाही. त्या घरकुलांसाठी आवश्यक असलेला तीन कोटी २४ लाख रुपयांचा निधी शासनाच्या विशेष अनुदानातून उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरले. तसेच घरकुलांसाठी आलेल्या शासनाच्या अनुदानावरील बॅँकेत जमा झालेले व्याज घरकुल उभारणीसाठी वापरण्याची म्हाडाने मंजुरी द्यावी, यासाठी बुधवारी मुंबईला शिष्टमंडळ जाण्याचा निर्णयही घेण्यात आला. या शिष्टमंडळामध्ये लाभार्थ्यांचे प्रतिनिधी घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)


शासनाकडून ४.२५ कोटी मिळविणे अत्यावश्यक
जयभीम झोपडपट्टीमध्ये असलेल्या ७२६ लाभार्थ्यांपैकी ६१२ लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या इमारती अंतिम अवस्थेत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तीन कोटी ४९ लाख रुपये लागणार आहेत.
तसेच उर्वरित १०८ घरकुलांकरिता तीन कोटी २४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. असा एकूण सहा कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करणे अत्यावश्यक आहे. यापैकी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी पालिकेकडून उपलब्ध होऊ शकतो.
मात्र, नगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता उर्वरित निधीकरिता विशेष बाब म्हणून अनुदान मिळवून घ्यावे लागेल, अशी माहिती कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी यावेळी दिली.

Web Title: Ichalkaranji's house list will be published today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.