इचलकरंजीजवळ यंत्रमाग कामगाराचा खून, मित्रासोबत वाद झाल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:28 AM2018-12-13T11:28:00+5:302018-12-13T11:29:29+5:30
हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे यंत्रमाग कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. अमोल दिलीप चव्हाण (वय ३0) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे.
यड्राव : हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे यंत्रमाग कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. अमोल दिलीप चव्हाण (वय ३0) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे.
इचलकरंजीपासून जवळ असलेल्या खोतवाडी पाण्याच्या टाकीजवळ निर्जन स्थळी मध्यरात्री ही घटना घडली. त्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल १२ वार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अमोल रात्री दहा वाजेपर्र्यत कारखान्यात काम करत होता, अशी माहितीही पुढे आली आहे.
दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अरुण पोवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथक बोलाविले होते, परंतु ते त्या परिसरातच घुटमळले.
अमोल चव्हाण याचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वसंतगड येथे आहे. गेल्या 30 वर्षापासून यंत्रमाग कामासाठी ते येथे आले आहेत. खोतवाडीच्या शिंदे मळ्यात चव्हाण परिवार घर बांधून राहिले आहेत. त्याच्यासोबत आई, वडील व बहीण असा अमोलच्या मागे परिवार आहे. वसंतगड येथील नातेवाईकांना पहाटे तीन वाजता ही घटना समजल्यानंतर ते इकडे आले.
यंत्रमाग कामगार असलेले त्याचे वडील दिलिप चव्हाण यांनी शहापूर पोलिसांत तक्रार दिली असून या घटनेची नोंद झाली आहे. आरोपीच्या शोधात पोलिस पथके सर्व दिशांनी रवाना झाली आहेत.