इचलकरंजीत सत्तेसाठी मोर्चेबांधणी

By admin | Published: October 1, 2016 12:31 AM2016-10-01T00:31:40+5:302016-10-01T00:41:06+5:30

आगामी नगरपालिका निवडणूक : ‘इलेक्शन मेरिट’ असलेल्या इच्छुकांना नेत्यांकडून तयारीला लागण्याचे संकेत

Ichalkaranji's power front | इचलकरंजीत सत्तेसाठी मोर्चेबांधणी

इचलकरंजीत सत्तेसाठी मोर्चेबांधणी

Next

इचलकरंजी : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीबाबतच्या शासनाच्या घोषणेची मार्ग प्रतीक्षा न करता नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येथील राजकीय पक्ष व आघाड्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. संबंधित प्रभागात असलेल्या इच्छुक उमेदवारांचे ‘इलेक्शन मेरिट’ पाहून नेतृत्वाने त्याला तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर इच्छुकांनीही प्रभागांची निश्चिती करीत असतानाच जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेसाठी राजकीय पक्षांच्या पातळीवर निवडणुका लढविण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे. अशा स्थितीत येथील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, आदी राजकीय पक्षांनी निवडणुका लढविल्या आहेत. भाजप-शिवसेना व अन्य पक्षांतील बंडखोरांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडीमार्फत सुद्धा गेल्या तीन निवडणुकांमध्ये एक वेगळा पायंडा पालिका निवडणुकीत पडला आहे. अशा पार्श्वभूमीवर २०११ मधील निवडणुकीत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले होते.
नगरपालिकेमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी एकत्रितपणे सत्तेवर आहे. अशा स्थितीत नगराध्यक्षपद हे कॉँग्रेसच्या वाट्याला आले असून, जानेवारी २०१५ मध्ये पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी त्यावेळी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर नगरपालिकेच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल झाला. गेल्या २१ महिन्यांच्या कालावधीत झालेल्या घडामोडींचा परिणाम नगरपालिकेच्या कामकाजावर झाला. त्याचप्रमाणे पालिकेतील व शहरातील राजकीय वातावरण बदलत गेले.
सध्याच्या नगरपालिका सभागृहाचा कालावधी डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. अशा स्थितीमध्ये शासनाकडून द्विसदस्यीय प्रभाग पद्धती आणि जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय झाला आहे. मात्र, त्याबाबत अधिकृतपणे घोषणा झाली नाही. नगराध्यक्ष निवडीबाबत निर्णय लागल्यानंतरच राजकीय पक्ष व आघाड्यांच्या पातळीवर राजकीय जुळवाजुळवीची समीकरणे सुरू होणार होती; पण नगराध्यक्ष निवडीचा निर्णय लांबणीवर पडत असल्याने आता याची वाट न पाहता शहर पातळीवर राजकीय पक्ष व आघाड्यांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
अशा वातावरणात इचलकरंजीत चाळके गटाची मॅँचेस्टर व कारंडे गटाची राजर्षी शाहू अशा दोन आघाड्यांचा नव्याने उदय झाला. या दोन्ही आघाड्यांकडे असलेल्या इच्छुक उमेदवारांचे त्यांच्या प्रभागात ‘इलेक्शन मेरिट’ आहे. याचा विचार करून शहर विकास आघाडी व कॉँग्रेसने हालचालींना सुरुवात केली आहे. शहर विकास आघाडीमध्ये शिवसेना १0 दहा, शाहू आघाडी १0, मॅँचेस्टर आघाडी ८, व भाजप ३४ अशा जागा लढविण्याची चिन्हे आहेत; पण मॅँचेस्टर आघाडीतील प्रमुखांचे कॉँग्रेस नेतृत्वाशी संधान सुरू आहे. त्यामुळे ‘शविआ’चे समीकरण बदलून कॉँग्रेस ४२, जांभळे गट १0 व मॅँचेस्टर आघाडी आठ अशाही जागा लढविल्या जातील, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

प्रमुखांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे : हाळवणकर
शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार सुरेश हाळवणकर यांनी जाहीरपणे घोषणा केली नसली तरी त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत ‘शविआ’कडून युती करण्यात येणाऱ्या अन्य आघाड्यांमध्ये मात्र काहीशी गोंधळाची स्थिती आहे.

Web Title: Ichalkaranji's power front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.